आयुक्तालय आवारातील शौचालयाची दुरवस्था
By admin | Published: September 11, 2015 11:05 PM2015-09-11T23:05:55+5:302015-09-11T23:06:21+5:30
आयुक्तालय आवारातील शौचालयाची दुरवस्था
नाशिकरोड : विभागीय आयुक्त कार्यालय आवारातील कॅन्टीन शेजारील शौचालयाची अत्यंत दुरवस्था झाली असून, दुर्गंधीमुळे येणारे-जाणारे हैराण झाले आहेत.
विभागीय आयुक्त कार्यालय आवारात कॅन्टीनशेजारी लाखो रुपये खर्च करून काही महिन्यांपूर्वीच सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले आहे. विभागीय आयुक्त कार्यालय आवारातील शासकीय कार्यालयामध्ये कामानिमित्त येणारे नागरिक, कर्मचारी यांच्या सोयीसाठी सदर शौचालय बांधण्यात आलेले आहे. मात्र त्यांच्या सुरक्षितेच्या व स्वच्छतेच्या दृष्टीने गांभीर्यपूर्वक लक्ष न दिले गेल्याने त्या शौचालयाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. शौचालयातील नळ चोरीला गेले असून, पाण्याचीदेखील सुविधा नाही. नियमितपणे स्वच्छता न झाल्याने प्रचंड घाण साचल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. तंबाखू, गुटखा, पान खाऊन थुंकल्याने सर्वत्र घाण साचली आहे. त्यामुळे त्या ठिकाणाहून येणाऱ्या-जाणाऱ्यांना दुर्गंधीमुळे नाकाला रुमाल
लावावा लागतो. ज्या हेतुने शौचालय बांधले होते त्यांचा सुरक्षितता व स्वच्छतेअभावी
फारसा उपयोग होत नसल्याने संबंधितांची गैरसोय होत आहे. (प्रतिनिधी)