त्र्यंबकेश्वर तहसिलदार कार्यालयावर श्रमजीवी संघटनेचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 05:49 PM2018-08-08T17:49:57+5:302018-08-08T17:51:18+5:30
विविध मागण्यां : शेतक-यांच्या मागण्यांचे निवेदन
त्र्यंबकेश्वर : शेतक-यांच्या हक्कासाठी महाराष्ट्र राज्य श्रमजीवी संघटनेच्या वतीने बुधवारी (दि.८) त्र्यंबकेश्वर तहसिलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
सकाळी ११ वाजता त्र्यंबकेश्वर येथील वाहन तळावरु न मोर्चा घोषणा देत त्र्यंबकेश्वर तहसिल कार्यालयावर नेण्यात आला. मोर्चाचे रुपांतर सभेत झाल्यानंतर पदाधिका-यांनी शेतक-यांचे प्रश्न मांडले. शेतकरी अल्पभूधारक व वनहक्क प्लॉटधारक यांना शेती लागवडीसाठी रोजगार हमी योजनेत सामावुन घेण्यात यावे. दि. २७ एप्रिल २०१८ च्या आदेशानुसार आदिम जमात शेतमजुर भुमिहीन व कामगारांच्या राहत्या घरांच्या जागा त्यांच्या नावे करण्याची तात्काळ कार्यवाही करावी, या मागण्यांसाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. ९ आॅगस्ट हा दिवस क्रांतीदिन साजरा करण्याबरोबरच जागतिक आदिवासी दिन म्हणूनही पाळला जातो. त्या पार्श्वभुमीवर आदिवासी शेतक-यांच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधले जावे, यासाठी निवेदन देण्यात आले. मोर्चात जिल्हाध्यक्ष गौतम अंबापुरे, जिल्हा युवक प्रमुख भगवान डोखे, शहर प्रमुख माजी सैनिक रामराव लोंढे, तालुकाध्यक्ष शिवाजी दराने, तानाजी शिंदे, बारकु वारे, रामदास भगत, मिराबाई लहांगे आदीसह शेतकरी सहभागी झाले होते.
तहसिलदारांनी स्वीकारले निवेदन
सध्या सरकारी कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर गेले आहेत. त्यामुळे त्र्यंंबकेश्वर तहसिल कार्यालयातील सर्व कर्मचारीही संपावर गेले असल्याने तहसिलदार महेन्द्र पवार यांनी स्वत: मोर्चाला सामोरे जाऊन कार्यालयात निवेदन स्विकारले.