श्रीविसर्जन मिरवणूकीत अवाजवी आवाज़़
By admin | Published: September 10, 2014 09:46 PM2014-09-10T21:46:29+5:302014-09-11T00:17:34+5:30
श्रीविसर्जन मिरवणूकीत अवाजवी आवाज़़
प्रतिनिधी
नाशिक, दि. १० - सर्वोच्च न्यायालयाने ध्वनीप्रदूषणाबाबत दिलेल्या आदेशात शांतता क्षेत्रामध्ये दिवसा ५० डेसीबलपेक्षा जास्त आणि रात्री ४० डेसीबलपेक्षा जास्त, रहिवासी परिसरात दिवसा ५५ डेसिबलपेक्षा जास्त व रात्री ४५ डेसिबलच्या पुढे वातावरणातील ध्वनींची पातळी जाणार नाही, याची दक्षता घ्यावी असे म्हटले आहे़ तसेच नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कायदेशीर कारवाई करावी असे म्हटले आहे़ मात्र न्यायालयाचा हा आदेश व ध्वनिप्रदूषणाविरोधात गेले काही दिवस सातत्याने सुरू असलेल्या प्रबोधनात्मक चळवळीकडे कानाडोळा करून नाशिकमधील काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी अनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकांमध्ये आवाजाच्या मर्यादांचे सर्रास उल्लंघन केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे़
मंडळांचा दिखावूपणाकडे कल़़
प्रचंड आवाजाने भिंत कोसळून भाविकांचा मृत्यू ही भयानक घटना आहे. आवाजाची मर्यादा आपण ओलांडून कोणासाठी हे सर्व करतोय याचे भान सुटले असेच दुर्दैवाने म्हणावे लागेल. भक्तीभाव आणि समाजासाठी भरीव कार्य करण्याचे मुख्य उद्दीष्ट असणे गरजेचे असताना केवळ दिखावूपणा करण्याकडे वाढलेला कल पाहून असे उत्सव नसलेले बरे अशीच भावना मनात दाटून येते. कुणासाठी आणि कशासाठी हे जर सांगण्याची वेळ आली तर अज्ञानाची कमाल आहे. त्यापेक्षा आपण हा उत्सव कसा साजरा करतो हा प्रश्न प्रत्येकाने स्वत:ला आणि आपल्या गल्लीतील कार्यकर्त्यांना विचारला पाहिजे.
- विजय जानोरकर, म्हसरूळ, नाशिक़
प्रत्येकाने विचार करायला हवा़़़
मोठा आवाज म्हणजे आनंद हि अंधश्रधाच नाही का ? कोणत्या पोथीत असे लिहिले आहे? अरे ! वाचवा रे हिंदू धर्म, अशा वेड्या लोकांपासून, जे स्वत:ला, धर्म रक्षक समजतात! खरे तर हे लोक धर्म राक्षस आहेत. डॉल्बीचा आवाजावर कायद्याने नियंत्रण का असत नाही? डॉल्बी उत्पादन, विक्र ी आणि वापर यावर कडक बंधने आणायला हवे़ आपण नक्की कुणासाठी आणि कशासाठी हा उत्सव करतो या प्रश्नाचा प्रत्येकाने विचार करायला हवा?
- सोमनाथ खैरनार, जेलरोड, नाशिक रोड़
नागरिकांची मानसिकता नाही़़़
डीजेमुळे त्रासच अधिक होतो, विशेषत: हृदयरोग असणाऱ्यांना तर विशेष काळजी घ्यावी लागते़ त्यामुळे डीजेच्या वापरावर त्वरित बंदी आणून त्याची कडक अंमलबजावणी करायला व्हावी. साताऱ्यासारख्या आपण अजून किती जणांच्या आरोग्याला धोका होण्याची वाट बघणार आहोत? सर्वोच्च न्यायालयाने सर्वच उत्सवांसाठी तयार केलेल्या नियमावलीचे काटेकोर पालन करणे खूप महत्वाचे आहे. मात्र दुर्दैवाने नागरिकांमध्ये शिस्तीची खूप कमतरता आहे. त्यामुळे कदाचित आपण मागे आहोत.
- सुजीत वडजे, म्हसरूळ, नाशिक़
नवीन नियमावलीची आवश्यकता़़़
सातऱ्यातील घटना ही नक्की डिजेच्या आवाजामुळे घडली की आणखी कुठल्या कारणामुळे हे तपासाअंती समोर येईल़ तसेच डिजेच्या प्रचंड आवाजामुळे मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होतात हे मात्र खरे आहे़ साताऱ्याच्या घटनेवरून अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी डिजेसाठी नव्याने नियमावली तयार करण्याची आवश्यकता आहे़
- विनायक शिंदे, प्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडऴ