श्री चक्रधरस्वामी अष्टम शताब्दी जयंती महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 11:27 PM2020-08-21T23:27:09+5:302020-08-22T01:13:37+5:30
त्र्यंबकेश्वर : नाशिक जिल्हा महानुभाव समितीच्या वतीने भगवान श्री चक्रधरस्वामी अष्टम शताब्दी जयंती महोत्सवास गुरुवारी अंजनेरी, ता. त्र्यंबकेश्वर येथे उत्साहात प्रारंभ झाला. यानिमित्त व्याख्यान सत्रासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
त्र्यंबकेश्वर : नाशिक जिल्हा महानुभाव समितीच्या वतीने भगवान श्री चक्रधरस्वामी अष्टम शताब्दी जयंती महोत्सवास गुरुवारी अंजनेरी, ता. त्र्यंबकेश्वर येथे उत्साहात प्रारंभ झाला. यानिमित्त व्याख्यान सत्रासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
अंजनेरी येथील श्री पंचकृष्ण आश्रमात आयोजित जयंती महोत्सवातील प्रबोधन सभा व व्याख्यान सत्राच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे उपाध्यक्ष आचार्यप्रवर महंत सुकेणेकरबाबा शास्री होते. याप्रसंगी महंत सुकेणेकरशास्री यांनी महानुभाव पंथाच्या तत्वज्ञानाचा आढावा घेतला. चक्रधरस्वामी यांनी सुमारे आठशे वर्षांपूर्वी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत महाराष्टÑात परिभ्रमण करीत तत्कालीन समाजामध्ये धर्मप्रबोधनाचे कार्य केले. त्या काळातील कर्मकांड, अंधश्रद्धा आणि जुनाट चालिरीती यांच्यावर त्यांनी प्रहार केला. तसेच सत्य, अहिंसा, समता, स्री-पुरुष समानता, व्यसनमुक्ती आदी गोष्टींचा प्रचार आणि प्रसार केला. त्यांनी मांडलेले तत्त्वज्ञान आजही प्रेरणादायी आहे, असे शास्री यांनी सांगितले.
प्रा. बाळकृष्ण अंजनगावकर यांनी महानुभाव पंथाचे कार्य आणि नाशिक जिल्ह्यातील पंथाची तीर्थस्थाने या विषयावर विचार व्यक्त केले. माजी आमदार बाळासाहेब सानप यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रारंभी संत-महंतांचे स्वागत अंजनेरीचे सरपंच राजेंद्र बदादे आणि संजय चव्हाण यांनी केले. कार्यक्रमास अॅड. पांडुरंग बोधले, गणेश चव्हाण, योगेश म्हस्के, चिंतामण वैरागी, राजधर सुकेणेकर, लक्ष्मण चिचोंडीकर उपस्थित होते.
पहाटे ५ वाजता गोविंदराज बाबा अंकुळनेरकर यांच्या हस्ते देवास मंगलस्नान घालण्यात आले. श्री भगवद्गीता व श्री चक्रधर स्तोत्र पारायण, नामस्मरण करण्यात आले. महंत बाळकृष्ण सुकेणेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. जन्मसोहळ्याप्रसंगी देवास विडा अवसर, उपहार अर्पण करून आरती करण्यात आली.