श्री गणेश चित्रमाला प्रदर्शन: गणरायाच्या विविध रुपांची गणेशभक्तांना मोहिनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 01:27 PM2018-09-19T13:27:53+5:302018-09-19T13:30:33+5:30
या चित्रप्रदर्शनात एकूण ३० कलाकृती प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. यामध्ये काही चित्राकृती तर काही ताम्रपत्रावर कोरलेल्या गणरायांच्या विविध रुपे आहेत. रेषांवर विशेष प्रभुत्त्व असलेल्या वर्मा यांनी प्रामुख्याने गणरायाचा बालाजी अवतार, सरस्वती अवतार, पंचमुखी हनुमान अवतार, दत्तमुखी अवतार आपल्या कुंचल्यातून रेखाटले आहेत.
नाशिक : गीतकार यशवंत देव यांनी ‘कोटि कोटि रुपे तुझी...’ या भक्तीगीतातून वर्णिल्या महिमेनुसार श्री गणरायाची नानाविध रुपे, अवतार नाशिककरांसमोर चित्राकृतींच्या माध्यमातून मांडण्यात आले आहेत. गणरायाच्या विविध रुपांनी गणेशभक्तांना मोहिनी घातली आहे.
निमित्त आहे, गणेशोत्सवानिमित्त चित्रकला महाविद्यालयातील प्राध्यापक दीपक वर्मा यांनी रेखाटलेल्या गणरायांच्या विविध अवतार व ताम्रपत्रावरील रुपांच्या चित्रप्रदर्शनाचे. गंगापूररोडवरील हार्मनी कलादालनात श्री गणेश चित्रमाला प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवारी करण्यात आले. हे चित्रपद्रशर्न येत्या शुक्रवारपर्यंत (दि.२१) संध्याकाळी ५ ते रात्री ९ यावेळेत सर्व गणेशभक्तांसाठी मोफत खुले राहणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली. उद्घाटनाप्रसंगी पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल, वैशाली जैन, विजयन सोहोनी, अॅड. मृणालिनी खैरनार, रघुनाथराव कुलकर्णी, बाळ नगरकर आदि उपस्थित होते.
या चित्रप्रदर्शनात एकूण ३० कलाकृती प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. यामध्ये काही चित्राकृती तर काही ताम्रपत्रावर कोरलेल्या गणरायांच्या विविध रुपे आहेत. रेषांवर विशेष प्रभुत्त्व असलेल्या वर्मा यांनी प्रामुख्याने गणरायाचा बालाजी अवतार, सरस्वती अवतार, पंचमुखी हनुमान अवतार, दत्तमुखी अवतार आपल्या कुंचल्यातून रेखाटले आहेत. लक्षवेधी रंगसंगती, अलंकारिक-सृजनशिल मांडणी हे या चित्रांचे वैशिष्टय आहेत. प्रदर्शित करण्यात आलेल्या चित्राकृतींमधील गणरायांच्या विविध रुपे बोलकी वाटतात.
गणेशोत्सवामध्ये नाशिककरांनी या प्रदर्शनाच्या माध्यमातून आपल्या लाडक्या बाप्पांची विविध रुपे न्याहाळण्याची संधी मिळाली असून नाशिककर गणेश भक्तांनी उद्घाटनाच्या दिवशी गणरायांची चित्ररुपे न्याहाळण्यासाठी गर्दी केली होती.