श्री निवृत्तीनाथ मंदिर कलशारोहण सोहळा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2022 12:07 AM2022-04-26T00:07:48+5:302022-04-26T00:10:23+5:30
त्र्यंबकेश्वर : येथील संत निवृत्तीनाथ महाराजांच्या मंदिर जीर्णोद्धाराचे काम सुरूच असून, या मंदिरावर येत्या २२ मे रोजी सव्वा किलो ...
त्र्यंबकेश्वर : येथील संत निवृत्तीनाथ महाराजांच्या मंदिर जीर्णोद्धाराचे काम सुरूच असून, या मंदिरावर येत्या २२ मे रोजी सव्वा किलो वजनाचा सोन्याचा कळस चढविण्यात येणार आहे.
समाधी ट्रस्टचा एकहाती विश्वस्तांचा कार्यकाळ संपवून न्यायालयाने विश्वस्त मंडळ स्थापन करण्याचा आदेश दिला आणि सन २०१५ मध्ये धर्मदाय आयुक्त यांनी सन २०१५ मध्ये विश्वस्त मंडळाचे नियुक्ती केली व प्रथम अध्यक्षपदाचा मान वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ विश्वस्त त्र्यंबकराव गायकवाड यांना मिळाला. पुंडलिकराव थेटे, संजय नाना धोंडगे, पवन भुतडा, पंडितराव कोल्हे, जयंतराव गोसावी आदी वारकरी संप्रदायातील मंडळींनी संत निवृत्तीनाथ समाधी ट्रस्टचा कार्यभार हाती घेतला. गायकवाड, धोंडगे महाराज, कोल्हे महाराज, पवन भुतडा यांनी मंत्रालयात निधी आणण्यासाठी वारंवार मंत्र्यांच्या भेटी घेतल्या, पण हाती काहीच पडले नाही.
दरम्यानच्या काळात सन २०१५ ला नियुक्त झालेल्या विश्वस्तांची मुदत सन २०२० लाच संपली असून, त्यानंतर मात्र धर्मादाय आयुक्त यांनी दिलेल्या निकषानुसार अर्ज बोलावले होते. पण दोन वेळा संधी देऊनही धर्मदाय आयुक्त यांचे निकष पूर्ण न होऊ शकल्याने सध्या विश्वस्त नियुक्ती प्रक्रिया दोन वर्षांपासून थांबविण्यात आली आहे.
पण निवृत्तीनाथ मंदिराचे प्रशासकीय कामकाज थांबवू नये म्हणून धर्मादाय आयुक्तांच्या अधिकाराखाली प्रशासकीय समिती कामकाज पाहत आहेत. त्यांच्याच कार्यकाळात समाधी मंदिराचे अपुरे राहिलेले काम पूर्ण झाले असून, आता कळसही चढणार आहे.
आता केवळ सोन्याच्या कळसाचे काम बाकी आहे. सुमारे सव्वा किलो सोन्याचा कळस देखील लोकवर्गणीतून चढविणार असल्याचा प्रशासकीय समितीने निर्णय घेतला आहे. येत्या २२ तारखेला तो संत निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी मंदिरावर चढविण्यात येणार आहे.
योगदान महात्त्वाचे...
सात वर्षांच्या कार्यकाळात विश्वस्त मंडळावर जे जे अध्यक्ष झाले, त्यांचे योगदान महत्त्वाचे असून, त्यास विश्वस्त म्हणून रामभाऊ मुळाणे, पुजारी विश्वस्त म्हणून योगेश गोसावी, अविनाश गोसावी, जिजाबाई लांडे, डॉ. धनश्री हरदास, ललिता शिंदे यांचा समावेश आहे.
दरम्यान, रविवारी (दि. २२) सोन्याचा कळस चढविण्यात येणार आहे. त्या दृष्टीने प्रशासकीय समितीची जोरदार तयारी सुरू आहे. या प्रशासकीय समितीवर अध्यक्ष व उपाध्यक्ष धर्मदाय आयुक्त कार्यालयातील असून, तीन सदस्य ॲड. भाऊसाहेब गंभिरे, मुख्याधिकारी त्र्यंबक नगर परिषद संजय जाधव व पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे हे आहेत.
सरकारी निधीची केवळ घोषणाच...
मंदिर भूमिपूजन प्रसंगी २२ कोटी रुपये देऊ, अशी घोषणा करणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री व आताचे मुख्यमंत्री यांनी अद्यापपावेतो एक रुपयाही दिला नाही. ही वारकरी संप्रदायाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या मंदिराला एक रुपया देखील महाराष्ट्र शासनाने अद्याप दिलेला नाही. (२५ संत निवृत्तीनाथ महाराज)