युवकांच्या व्यवसायाचा ‘श्रीगणेशा’
By admin | Published: September 8, 2015 10:53 PM2015-09-08T22:53:12+5:302015-09-08T22:53:58+5:30
प्रेरणादायी : पदवीधर असूनही नोकरी मिळत नसल्याने ते बनले मूर्तिकार
शैलेश कर्पे, सिन्नर
घरी मोठी शेतजमीन असताना पर्जन्यमानाच्या लहरीपणामुळे शेतीत उत्पन्न मिळत नाही. परिस्थितीवर मात करून मन लावून शिक्षण घेतले, पदवी मिळवली, मात्र नोकरी नाही. त्यामुळे सिन्नर तालुक्यातील वावी येथील सुशिक्षित युवकांनी मूर्ती बनविण्याचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. दोन महिन्यांच्या अथक परिश्रमातून त्यांनी सुमारे सातशे आकर्षक व सुबक गणेशाची विविध रुपे साकारून जिद्द व मेहनतीने परिस्थितीवर मात करता येते याचा आदर्श सुशिक्षित बेरोजगार युवकांपुढे ठेवला आहे.
वैभव नवले हा वावी परिसरातील हरहुन्नरी कलाकार. े जी. डी. आर्टचे शिक्षण घेऊन व हातात चांगली कला असूनही नोकरी मिळत नसल्याने वैभव नवले याने मोहित अहेर याच्या साथीने मूर्ती बनविण्याचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. मोहित अहेर यानेही औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत व्यवसाय शिक्षणाचे धडे गिरवले. नोकरी नसल्याने या दोघा युवकांनी आपली कला व्यवसायासाठी वापरण्याचा निर्णय घेतला. मूर्तीचे साचे व साहित्य आणून ते गणेशाची विविध रुपे साकारू लागले. त्यांनी बनविलेल्या आकर्षक मूर्ती पाहून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनीही त्यांना मदतीचा हात पुढे केला. वैभव हा चांगला पेंटर असल्याने त्याने गणेशाच्या मूर्तीही चांगल्या रंगवल्या. त्यामुळे या उभय युवकांच्या गणपती बनविण्याच्या ठिकाणावर बघ्यांची गर्दी वाढू लागली आहे.