अयोध्येतील श्रीराममंदिराची लवकरच मुहूर्तमेढ
By Admin | Published: January 26, 2015 12:37 AM2015-01-26T00:37:10+5:302015-01-26T00:37:29+5:30
हुकूमचंद सावला : विहिंपचे हिंदू संमेलन; गो-हत्त्येसाठी कायद्यात हवी मृत्युदंडाची शिक्षा
नाशिक : अयोध्येतील वादग्रस्त बाबरी मस्जिदच्या ठिकाणीच प्रभु श्रीरामचद्रांचा जन्म झाल्याचे पुरावे आमची अठरा पुराणे देत असून, न्यायालयानेदेखील हे मान्य केले आहे़ त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर लवकरच अयोध्येतील राममंदिर उभारणीस सुरुवात होणार आहे़ याबरोबरच गो-हत्त्या बंदीसाठी विहिप सव्वा कोटी गो रक्षक तयार करणार असून, गो हत्त्या करणाऱ्यांना मृत्युदंडाच्या शिक्षेची कायद्यात तरतूद केली जावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय उपाध्यक्ष हुकूमचंद सावला यांनी केली़ रविवारी गंगाघाटावर झालेल्या विश्व हिंदू परिषदेच्या विशाल हिंदू संमेलनात ते बोलत होते़
सावला पुढे म्हणाले की, न्यायालयाने श्रीराम जन्मस्थळाबाबत निर्णय दिलेला असून, या संपूर्ण जागेवर राममंदिराची उभारणी केली जाणार आहे़ सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर या ठिकाणी मंदिर उभारणीचे काम सुरू केले जाणार आहे़ देशात जो दहशतवादी आहे, हिंसा करतो, पशु-पक्ष्यांना ठार मारतो त्यांना धर्मनिरपेक्ष, तर सर्वांची सुखाची कामना करणारे, गो-रक्षा करणाऱ्या हिंदूंना मात्र जातीयवादी म्हटले जाते़ विहिंप ही जातीयवादी नाही तर समाजातील विषमता कमी करून सर्व हिंदुंना संघटित करण्याचे काम करीत आहे़ परधर्मात गेलेल्या हिंदुंना परत धर्मात प्रवेश देणे, सव्वा कोटी गो-रक्षक तयार केले जाणार असून, गो-हत्त्या करणाऱ्यांना मृत्युदंडाची शिक्षा देण्याची मागणी सरकारकडे केली जाणार असल्याचे सावला म्हणाले़
पश्चिम महाराष्ट्राचे प्रांत एकनाथ शेटे म्हणाले की, सशक्त हिंदू ही देशाची ओळख असून, त्यांसाठी सर्व हिंदुंनी संघटित होण्याची आवश्यकता आहे़ देशभरात सुरू असलेल्या ‘लव्ह जिहाद’मुळे अनेक हिंदू तरुणींचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे़ आणि या विरोधात विश्व हिंदू परिषदेने घेतलेली भूमिका योग्य असून, हीच भूमिका कायम राहणार आहे़ हिंदू संघटना या कधीही दंगे घडवित नाहीत तर त्या राष्ट्रवादी असून, हिंदुंना संघटित करण्याचे काम करीत आहेत, तसेच बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे हिंदू संघटनांच्या शिव्याशाप कमी झाल्याचेही शेटे यांनी सांगितले़
व्यासपीठावर पश्चिम महाराष्ट्राचे प्रांत एकनाथ शेटे, भार्गव सरपोतदार, त्र्यंबकेश्वरच्या आनंद आखाड्याचे सागरानंद सरस्वती, माधवदास राठी महाराज, भारत सेवाश्रम संघाचे स्वामी श्री. परिपूर्णानंदजी महाराज, रामसिंग बावरी उपस्थित होते़ कार्यक्रमाचे प्रास्ताविक संमेलनाचे आयोजक गणेश सपकाळ यांनी केले़ सूत्रसंचालन अॅड़ मीनल भोसले यांनी केले़ संमेलनासाठी विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते़ (प्रतिनिधी)