शुभम पार्क-उमा पार्क रस्त्यावरून वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 12:24 AM2019-07-14T00:24:23+5:302019-07-14T00:33:09+5:30
प्रभाग क्रमांक २८ मधील शुभम पार्कपासून उमा पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यावर मनपाच्या वतीने मुरूम व कच टाकण्याचे काम सुरू असताना एका नागरिकाने जागेचा हक्क सांगत स्वत:च्या डोक्यात दगड मारत दुखापत करून घेतल्याचा प्रकार घडला असून, काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सिडको : येथील प्रभाग क्रमांक २८ मधील शुभम पार्कपासून उमा पार्ककडे जाणाऱ्या रस्त्यावर मनपाच्या वतीने मुरूम व कच टाकण्याचे काम सुरू असताना एका नागरिकाने जागेचा हक्क सांगत स्वत:च्या डोक्यात दगड मारत दुखापत करून घेतल्याचा प्रकार घडला असून, काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सिडकोतील प्रभाग क्रमांक २८ मधील शुभम पार्क येथून सरळ उमा पार्ककडे जाणाºया रस्त्यावर पावसामुळे खड्डे पडले होते. याबाबत परिसरातील महिलांनी प्रभागाच्या नगरसेवकांना याठिकाणी मुरूम अथवा कच टाकण्याची विनंती केली होती. यामुळे याठिकाणी मनपाच्या वतीने मुरूम व कच टाकण्याचे काम सुरू असताना याच ठिकाणी राहणाºया एका नागरिकाने रस्त्यातच ठिय्या मांडत रस्त्याची जागा आमची असल्याचे सांगत स्वत:च्या डोक्यात दगड मारून घेतल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर संबंधित नागरिकास इजा झाल्याने उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी सिडको प्रभाग सभापती दीपक दातीर, प्रतिभा पवार, सुवर्णा मटाले यांनी संबंधित नागरिकाची समजूत काढली. मनपाने कच्चा मातीचा रस्ता तयार केलेला आहे. पावसाळ्यात या रस्त्यावरून चालताना विद्यार्थी व नागरिक, वाहनचालकांना वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे.
रस्त्याची दुरवस्था
शुभम पार्कपासून उमा पार्ककडे जाण्यासाठी हा एकमेव रास्ता आहे. परंतु उमा पार्ककडे जाण्यासाठीच्या या कच्चा रस्त्याची पावसामुळे दयनीय अवस्था झाली. या भागात मोठ्या प्रमाणात नागरी वसाहत आहे. या भागातील नागरिक पंधरा वर्षांपासून नियमित मनपाची घरपट्टी व विविध कर भरतात. परंतु दुर्लक्षामुळे या भागात रस्ता झालेला नाही.