वाचन संस्कृती वाढत असल्याचा ‘शुभशकुन’

By admin | Published: October 15, 2016 02:17 AM2016-10-15T02:17:06+5:302016-10-15T02:24:44+5:30

पुस्तकांचा खप वाढला : सार्वजनिक वाचनालयात दर्जेदार ग्रंथ प्रतीक्षा यादीत

'Shubhasakun' is a growing culture of reading culture | वाचन संस्कृती वाढत असल्याचा ‘शुभशकुन’

वाचन संस्कृती वाढत असल्याचा ‘शुभशकुन’

Next

मुकुंद बाविस्कर ल्ल नाशिक
साधारणत: एक तपापूर्वी टीव्ही चॅनल्स, संगणक गेम्स, मोबाइल, नेटसर्फिंग अशा एका पाठोपाठ येणाऱ्या मोहमयी मायाजालाने मराठी वाचकांना जखडून टाकले की काय, अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे मान्यवर साहित्यिकांकडून सांगितले जात होते; परंतु गेल्या एक-दोन वर्षाचा विचार केल्यास पुस्तकांचा खप प्रचंड प्रमाणात वाढला आहे. वाचनालयातदेखील दर्जेदार ग्रंथ प्रतीक्षा यादीत आहेत, तेही चक्क महिना-दोन महिन्यांचे. ‘अग्निपंख’ या पुस्तकाची नाशिक सार्वजनिक वाचनालयात एका आठवड्यात सुमारे २५ वाचकांकडून विचारणा झाली. हा शुभयोग म्हणजे डॉ. अब्दुल कलाम यांच्या जयंतीला ‘वाचन’ प्रेरणा दिन साजरा होताना त्यांना मन:पूर्वक अभिवादन म्हणता येईल.
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती सार्थरितीने जतन करण्यासाठी त्यांचा जन्मदिन (दि. १५ आॅक्टोबर) हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय मागील वर्षी महाराष्ट्र शासनाने
घेतला आहे. नाशिक शहरात ६५ सार्वजनिक वाचनालये असून, जिल्ह्यात एकूण २९४ वाचनालये आहेत. या सर्वच ठिकाणी मागील वर्षाप्रमाणे यंदाही वाचन प्रेरणा दिन उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन रं. जोपुळे यांनी दिली.
अलीकडच्या काळात मराठी माणसे खरोखर ग्रंथ प्रदर्शन आणि ग्रंथ विक्री दालनात रमलेली दिसतात. नाशिकसारख्या शहरात विविध प्रकारची ग्रंथ प्रदर्शने वर्षभर सुरूच असतात. दिवाळी आणि उन्हाळाच्या सुटींमध्ये पुस्तक विक्रीचा खप वाढलेला दिसतो. ग्रंथ प्रदर्शनात विविध सवलत योजनेअंतर्गत हजारो पुस्तकांची विक्री झाल्याचे ज्योती स्टोअरचे संचालक वसंत खैरनार यांनी सांगितले. त्याचप्रमाणे सावानाच्या पाठीमागील तळघरात कायमस्वरूपी ग्रंथ प्रदर्शन सुरू असून यात व्यक्तिमत्त्व विकास, आरोग्य, बालवाङ्मय, शेती व्यक्तिचरित्र, कथा-कादंबरी अशा सर्वच प्रकारच्या साहित्याला मोठी मागणी असल्याचे विक्रेते जनार्दन भुवड यांनी सांगितले. तसेच सावानाच्या सभागृहात पुस्तक प्रदर्शनात व्यक्तिमत्त्व विकास, अनुवादित व बालवाङ्मयाला चांगली मागणी असल्याचे प्रकाशक विकास गायकवाड यांनी सांगितले.

Web Title: 'Shubhasakun' is a growing culture of reading culture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.