अधिकारी निवृत्त झाल्याने फेरबदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 12:52 AM2019-06-01T00:52:55+5:302019-06-01T00:53:15+5:30
महापालिकेचे प्रभारी अतिरिक्त आयुक्त हरिभाऊ फडोळ तसेच उपआयुक्त रोहिदास बहिरम यांच्यासह अन्य चार प्रमुख अधिकारी निवृत्त झाल्यानंतर प्रशासनात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत.
नाशिक : महापालिकेचे प्रभारी अतिरिक्त आयुक्त हरिभाऊ फडोळ तसेच उपआयुक्त रोहिदास बहिरम यांच्यासह अन्य चार प्रमुख अधिकारी निवृत्त झाल्यानंतर प्रशासनात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. शासकीय सेवेतून प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांवर अधिक जबाबदारी टाकण्यात आली आहेत. त्याअंतर्गत मलनि:स्सारण योजनेच्या अभियांत्रिकी काम बघणारे अधीक्षक अभियंता संदीप नलावडे यांना अतिरिक्त आयुक्त ही जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे फडोळ यांच्या जागी उपआयुक्त महेश डोईफोडे यांना अतिरिक्त आयुक्त दोन अशी जबाबदारी देण्यात आली आहे.
डोईफोेडे यांच्याकडे सध्या मालमत्ता व कर आकारणी एवढीच जबाबदारी होती आता त्यांच्याकडे फडोळ यांच्याकडे असलेल्या उद्यान व वृक्ष प्राधीकरण, फेरीवाला धोरण, घनकचरा व्यवस्थापन, आरोग्य, क्रीडा अशा सर्व सेवांचा अंतर्भाव आहे. संदीप नलावडे यांच्याकडे पाणीपुरवठा व मलनिस्सारण योजनेचे काम आहे त्यांच्याकडे बांधकाम, नगरसचिव, आपत्ती व्यवस्थापन, जनसंपर्क, विद्युत व यांत्रिकी अशा सर्व अन्य विभागांचा समावेश करण्यात आला आहे.
सहायक आयुक्त सुनीता कुमावत यांच्याकडे उपआयुक्त (प्रशासन) महेश बच्छाव यांच्याकडील कार्यभार देण्यात आाला असून, जयश्री सोनवणे यांच्याकडे अतिक्रमण उपआयुक्त रोहिदास बहिरम यांच्याकडील कारभार देण्यात आला आहे. त्यात फेरीवाला धोरणाचाही अंतर्भाव आहे. उद्यान विभागाचे उपआयुक्त शिवाजी आमले यांच्याकडे समाज कल्याण, महिला बाल कल्याण, अपंग कल्याण, क्रीडा असे पूर्वी फडोळ यांच्याकडे उपआयुक्त म्हणून असलेले कामकाज देण्यात आले आहे.