विश्वकल्याणासाठी शुक्ल यजुर्वेदतर्फे घनपाठाला प्रारंभ
By admin | Published: September 5, 2015 11:11 PM2015-09-05T23:11:18+5:302015-09-05T23:23:52+5:30
सिंहस्थ कुंभ पर्वात ११ दिवसीय पारायण
नाशिक : शुक्ल यजुर्वेदाच्या दोन हजार सुक्तांमध्ये विश्वाचे कल्याण व सृष्टीचे कल्याण आणि मानव कल्याणप्रमाणेच पशुपक्षी व सूक्ष्मजिवांच्या कल्याणाचा संकल्प आहे. लिखित स्वरूपात उपलब्ध नसलेल्या शुक्ल यजुर्वेद संहिता घनपाठ पारायणाला त्र्यंबकरोडवरील तिडके कॉलनीतील गुरू गंगेश्वरधाम येथे प्रारंभ झाला आहे. सिंहस्थ कुंभ पर्वात १२ वेदमूर्तींच्या माध्यमातून दोन हजार मंत्रांचे तेरापट म्हणजे २६ हजार मंत्रपाठ ११ दिवस सुरू राहणार आहे.
सुमारे ५० वर्षांच्या इतिहासात नाशकात प्रथमच शुक्ल यजुर्वेद संहिता घनपाठ पारायण होत आहे. मुंबईचे ईश्वर थदानी व मीरा थदानी या पारायणाचे यजमान आहेत. स्वामी आनंद भास्कर यांनी सिंहस्थ कुंभपर्वात तीर्थस्थानी केलेल्या पारायणाचे पुण्य चौपट होते म्हणून हा उपक्रम सुरू केला आहे.
वेदाचार्य शांतारामशास्त्री भानोसे यांच्या नेतृत्वाखाली सर्व वेदमूर्ती पंडित यशवंत पैठणे, पंडित दिनेश गायधनी, पंडित सूर्यकांत राखे (नाशिक), पंडित लोकेश आकोदकर (त्र्यंबकेश्वर), पंडित अनिल घोडेकर (वाराणसी), पंडित धनंजय जोशी (ओझर), पंडित महेश रेखे, पंडित देवेंद्र गढीकर, पंडित किरण पाठक, पंडित प्रशांत जोशी (आळंदी), निखिल भालेराव (राहाता) हे ११ वैदिक विद्वान पारायण करीत आहेत. (प्रतिनिधी)