नाशिकरोड परिसरात शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 10:05 PM2020-03-26T22:05:24+5:302020-03-26T23:02:03+5:30
नाशिकरोड : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला असून, राज्यात संचारबंदी लागू केली ...
नाशिकरोड : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला असून, राज्यात संचारबंदी लागू केली आहे. यामुळे नाशिकरोड परिसरामध्ये अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला. यामुळे रस्त्यावर शुकशुकाट पसरला होता. मात्र काही नागरिक जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी ये-जा करत होते. नागरिकांनी पॅनिक होऊन घाबरून न जाता मोठ्या धैर्याने घरात राहून परिस्थितीशी मुकाबला करावा, असे आवाहन नाशिकरोड उपनगर पोलिसांकडून करण्यात आले आहे.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी संपूर्ण देशात २१ दिवसांचा लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. तसेच राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली असून, संपूर्ण राज्याच्या व जिल्हा जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. संचारबंदी काळात बुधवारी नाशिकरोड परिसरात अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला. बहुतांश नागरिकांनी आपल्या कुटुंबीयांसह घरातच बसून कोरोनाशी दोन हात करण्याचा निर्धार व्यक्त केला.
काही नागरिक जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी ये-जा करताना दिसत होते. मात्र जे नागरिक किंवा युवक विनाकारण गांभीर्याने न वागता फिरत होते, घोळक्या घोळक्याने गप्पा मारत होते त्यांना पोलिसांनी लाठीचा प्रसाद देत पिटाळून लावले.