आधी शुकशुकाट, नंतर वाढला ओघ !
By admin | Published: September 18, 2015 11:41 PM2015-09-18T23:41:58+5:302015-09-18T23:44:08+5:30
पर्वणी : पावसामुळे भाविकांची पहाटे तुरळक हजेरी
नाशिक : कुंभमेळ्याच्या द्वितीय पर्वणीला पहाटे चारपासूनच सुरू झालेला भाविकांचा ओघ पाहता, तिसऱ्या पर्वणीलाही प्रारंभीपासूनच गर्दी होण्याची अपेक्षा होती; मात्र पहाटे सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे रामकुंड परिसरात शुकशुकाटच होता. जसजसा दिवस वर चढत गेला, तसतशी भाविकांची गर्दी वाढत गेली.
पोलिसांच्या अतिरेकी बंदोबस्तामुळे पहिल्या पर्वणीकडे भाविकांनी पाठ फिरवली. त्यानंतर प्रशासनाने बंदोबस्ताचे फेरनियोजन केल्यावर दुसऱ्या पर्वणीला भाविकांचा भरघोस प्रतिसाद लाभला. आता अखेरच्या पर्वणीला नेमके काय होते, याकडे बहुतेकांचे लक्ष लागून होते; मात्र शुक्रवारी पहाटे तीनपासूनच धुव्वाधार पावसाला सुरुवात झाल्यानंतर अनेकांचा हिरमोड झाला. पर्वणीची वेळ जवळ येत होती, तसतसा पावसाचा जोर वाढतच होता. त्यामुळे शहरातील रामकुंडाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर शुकशुकाट होता.
पाचच्या सुमारास महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा यांचे रामकुंडावर आगमन झाले. याच सुमारास पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांनीही सुरक्षेचा आढावा घेतला. पावसाचा जोर वाढत असल्याने मिरवणुकीची वेळ टळते की काय, याची चिंता या सर्वांच्या चेहऱ्यावर जाणवत होती. एव्हाना पुरोहित संघाचे पदाधिकारीही गोदाघाटावर दाखल झालेले नव्हते. दुसरीकडे पावसामुळे रामकुंडात ड्रेनेजचे पाणी मिसळून दुर्गंधी तर सुटणार नाही ना, याची चिंताही महापौर, उपमहापौरांना सतावत होती. तेवढ्यात मिरवणूक सुरू होण्याच्या तयारीत असल्याचे कळताच महापौरांनी रामकुंडावरून साधुग्रामकडे प्रयाण केले. काही वेळातच मिरवणूक गोदाघाटावर दाखल झाली व हळूहळू भाविकांची संख्याही वाढू लागली. (प्रतिनिधी)