नांदगावी पशुवैद्यकीय दवाखान्यात शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 06:23 PM2019-05-21T18:23:30+5:302019-05-21T18:23:49+5:30
अनेक पदे रिक्त : पशुंचे उपचाराविना हाल
नांदगाव : येथील पशुवैद्यकिय दवाखान्यात पूर्ण वेळ अधिकारी नसल्याने पशूंचे उपचाराविना हाल होत आहेत. परिणामी दवाखान्यात शुकशुकाट दिसून येत आहे.
तालुक्यातील पशुवैद्यकिय विभागाची अनेक पद रिक्त असल्याने एकाच वैद्यकिय अधिकाऱ्याला पाच पेक्षा अधिक दवाखाने सांभाळावे लागत आहेत. त्याशिवाय त्याभागात येणा-या गावांना देखील भेट द्यावी लागत असते. एकाच वेळेला अनेक दवाखाने सांभाळतांना त्यांची त्रेधा तिरपीट उडते. अशीच अवस्था पशुपालकांचीही होत आहे. नांदगांव येथे प्रथमवर्ग पशुवैद्यकिय दवाखान्यात पूर्ण वेळ अधिकारी नाही. येथे प्रभारी अधिकारी आहे. त्यांना नांदगांव ,पिंपरखेड ,पंचायत समिती विभाग,व अन्य दवाखाने बघावे लागतात. पंचायत समीती कार्यालयात पशुधन, पशुधन पर्यवेक्षक ही पदे रिक्त आहेत. येथे एकच अधिकारी आहे. ते सुद्धा प्रभारी आहेत. तालुक्यात एकूण १८ दवाखाने आहेत. त्यापैकी श्रेणी १ व दोनची ९ पदे रिक्त आहेत. सहाय्यक वर्ग अधिकाऱ्यांची १० पदे रिक्त आहेत. तसेच श्रेणी १ ला पशुधन अधिकारी ६ पदे रिक्त आहेत. पशुधन अधिकारी नसलेली गावे नांदगांव, साकोरा, हिसवळ, वाखारी, मनमाड, वंजारवाडी आदी ठिकाणी एकूण सात पदे रिक्त आहेत. येथील कारभारही प्रभारी अधिकारी बघतात. पशुधन पर्यवेक्षक १ रिक्त आहे. ७ दवाखाने राज्य शासनाकडे व ३ पंचायत समितीकडे असतात. परीचर (शिपाई ) २० पैकी ७ रिक्त आहेत.तालुक्यात सहा दवाखाने अधिकारीविना आहेत येथे फक्त शिपाई आहेत . तालुक्यतील भौरी, हिसवळ, वंजारवाडी, नांदगांव व पंचायत समिती पिंपरखेड, साकोरा मनमाड वाखारी, न्यायडोंगरी या व्यतिरिक्त १२ गावांतील पशुवैद्यकिय अधिका-यांची पदे रिक्त आहेत.अशावेळी उपचारास येणा-या प्राण्यावर उपचार कोणी करावे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.