नाशिकरोड बाजारपेठेत शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 12:38 AM2019-04-27T00:38:46+5:302019-04-27T00:39:05+5:30
दिवसेंदिवस उन्हाचा चटका वाढत चालल्याने त्याचा परिणाम सर्वच व्यवसायांवर झाला असून, दुपारच्या सुमारास तर बाजारपेठेत अघोषित संचारबंदी लावल्यासारखी स्थिती आहे.
नाशिकरोड : दिवसेंदिवस उन्हाचा चटका वाढत चालल्याने त्याचा परिणाम सर्वच व्यवसायांवर झाला असून, दुपारच्या सुमारास तर बाजारपेठेत अघोषित संचारबंदी लावल्यासारखी स्थिती आहे.
थंड हवेशीर आल्हाददायक अशी ओळख असलेल्या नाशिक शहरात गेल्या काही वर्षांपासून उन्हाचा चटका मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात तपमान ४० अंशांकडे झुकल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. उन्हाचा चटका सहन होत नसल्याने त्याचा परिणाम सर्वच व्यवसायावर होत आहे. यामुळे नाशिकरोडची मुख्य बाजारपेठ असलेल्या देवी चौक, सुभाषरोड, आंबेडकररोड या रस्त्यावर अघोषित संचारबंदी लावल्यासारखी स्थिती दुपारच्या काळात निर्माण होत आहे.
उन्हाच्या तीव्रतेमुळे दुपारी साडेअकरा-बारा वाजेपासून सायंकाळी पाच-साडेपाच वाजेपर्यंत बहुतांश व्यावसायिक, दुकानदार, रस्त्यावरील विक्रेते आपली दुकाने बंद करून घेण्यातच धन्यता मानतात. सायंकाळपासून बाजारात खरेदीची थोडी रेलचेल सुरू होते. एकीकडे उन्हाची तीव्रता व दुसरीकडे लोकसभा निवडणूक फिव्हर यामुळे बाजारपेठेत शांतता पसरली आहे. उन्हाच्या चटक्यामुळे रसवंतीगृह, दही, ताक, सरबत, टरबूज विक्रेते यांचा व्यवसाय मात्र जोरात सुरू आहे. ७ मे नंतर लग्नतिथी दाट असल्याने एप्रिल महिन्याच्या अखेरीस निवडणूक मतदानानंतरच व्यवसायात तेजी येईल, असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
सर्वच व्यवसायात मंदीचे सावट असून त्यात असह्य उन्हाची तीव्रता व निवडणुकीचे वातावरण यामुळे बाजारपेठेतदेखील शांतता आहे. निवडणूक मतदानानंतरच मे महिन्यात दाट लग्नतिथी आहे. तसेच उन्हाची तीव्रतादेखील उतरायला लागेल. त्यामुळे मे महिन्यापासून सर्वच व्यवसायाला चालना मिळेल.
- सोमनाथ मोरे, व्यावसायिक