श्रावणी सोमवारनिमित्त फुलली शिवालये
By admin | Published: August 19, 2014 12:50 AM2014-08-19T00:50:53+5:302014-08-19T01:20:49+5:30
भाविकांच्या रांगा : पहाटेपासून शहरात ठिकठिकाणी दर्शनासाठी गर्दी
नाशिक : ‘बम बम भोले’चा गजर करीत भाविकांनी श्रावणी सोमवारी शिवालयांत दर्शनासाठी गर्दी केली होती. शिवमंदिरांत पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. बहुतांश नागरिकांनी उपवास पाळल्याने उपवासाच्या पदार्थांसाठी दुकानांत गर्दी दिसत होती. हिंदू धर्मात श्रावण हा धार्मिक महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यातील सोमवारांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. यादिवशी शंकराची आराधना करून उपवास पाळला जातो.
सकाळपासूनच शहरात भाविकांची लगबग सुरू होती. फुलबाजारात फुले, बेलपानांच्या खरेदीसाठी गर्दी झाली होती. श्री कपालेश्वर, सोमेश्वरसह सर्वच मंदिरे फुलून गेली होती. पंचवटीसह नाशिकरोड, सिडको, इंदिरानगर, सातपूर, अंबड, म्हसरूळ आदि उपनगरांतही शिवमंदिरांमध्ये दिवसभर गर्दी दिसून येत होती. (प्रतिनिधी)