पोलीसांनी कारवाईची धमकी देताच पुन्हा शटर डाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:14 AM2021-04-13T04:14:06+5:302021-04-13T04:14:06+5:30
गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता ब्रेक द चेन अंतर्गत राज्य शासनाने पुन्हा ३० एप्रिलपर्यंत ...
गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता ब्रेक द चेन अंतर्गत राज्य शासनाने पुन्हा ३० एप्रिलपर्यंत बाजार पेठेत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे नाशिकच नव्हे तर राज्यातील व्यापाऱ्यांचा विरोध आहे. त्यामुळे व्यापारी संघटनांनी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स या शीर्ष संस्थेच्या नेतृत्वाखाली दोन दिवस मुख्यमंत्री आणि राज्यपालांना निवेदन पाठवून तसे न झाल्यास शुक्रवारपासून दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतला होता नंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन दोन दिवस आंदोलन स्थगित करण्यात आले होते. दोन दिवसांत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन उध्दव ठाकरे यांनी दिले होते. परंतु नंतर लॉकडाऊनचा विषय पुढे आला त्यानंतर केाणताच निर्णय न घेतल्याने सविनय कायदे भंगाचे आश्वासन करण्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार सोमवारी (दि.९) सकाळी शिवाजी रोड, मेनरोडसह काही भागात व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू केली. मात्र, पोलिसांनी कारवाईचा इशारा देताच शटर डाऊन करण्यात आले.
दरम्यान, दुकाने बंद असली तरी बाजारपेठेत गर्दी कमी नव्हती. रविवार पेठ आणि रविवार कारंजासह सर्वच ठिकाणी प्रचंड गर्दी किराणा दुकाने आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी झाली होती.
मुख्य बाजारपेठा वगळता उपनगर आणि विरळ वस्ती असलेल्या मार्गांवर अनेक ठिकाणी दुकाने सुरू होती. विशेषत: गुढीपाडव्यानंतर निर्बंध आणखी कठीण होणार या भीतीने गर्दी झाली होती.
इन्फो...
महापौरांकडून गर्दी टाळण्याचे आवाहन
राज्य शासनाने अगोदरचे निर्बंध कायम ठेवले असताना गेले दोन दिवस वीकेंड लॉकडाऊन होते तसेच पुन्हा एक-दोन दिवसात आणखी कठोर निर्बंध लागू होण्याची शक्यता गृहीत धरून बाजारपेठेत प्रचंड गर्दी झाली हेाती. त्यामुळे महापौर सतीश कुलकर्णी यांनी बाजारपेठेत जाऊन नागरिकांना गर्दी टाळण्याचे आवाहन केले. तसेच मास्क, सॅनिटायझर आणि सुरक्षित अंतर पालनाचे आवाहन केले.
कोट...
बाजारपेठेतील दुकाने सकाळी उघडण्यात आली. मात्र, पोेलिसांनी ती बळजबरी बंद केली. मुळात आम्हाला संघर्ष करायचा नव्हता तर प्रशासनाच्या सहकार्याने दुकाने खुली करण्यात येणार होती. या आधीही दुुकाने बंद असल्याने शहरातील रुग्ण संख्या कमी झालेली नाही. त्यामुळे अकारण व्यापाऱ्यांना वेठीस धरू नये.
- संतोष मंडलेचा, अध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ॲंड इंडस्ट्रीज