राज्यातील ६५२ मार्गांवर ‘शटल’सेवा

By admin | Published: March 8, 2017 12:36 AM2017-03-08T00:36:43+5:302017-03-08T00:36:58+5:30

नाशिक: सार्वजनिक क्षेत्रातील वाहतूक व्यवस्थेत राज्य परिवहन महामंडळाची भूमिका महत्त्वपूर्ण मानली जाते. खेडेगाव, वाडे-पाड्यांवर महामंडळाची लाल-पिवळी बस पोहचली आहे.

'Shuttle service' on 652 routes in the state | राज्यातील ६५२ मार्गांवर ‘शटल’सेवा

राज्यातील ६५२ मार्गांवर ‘शटल’सेवा

Next

संदीप भालेराव : नाशिक
खेड्यांना जोडणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील वाहतूक व्यवस्थेत राज्य परिवहन महामंडळाची भूमिका महत्त्वपूर्ण मानली जाते. खेडेगाव, वाडे-पाड्यांवर महामंडळाची लाल-पिवळी बस पोहचली आहे. लांब पल्ल्याच्या वाहतूक व्यवस्थेचे जाळे विणलेल्या महामंडळाने आता ग्रामीण भागासाठी ‘शटल बससेवा’ सुरू केली असून, छोट्या पल्ल्याकडे महामंडळाने लक्ष केंद्रित केले आहे. सध्या राज्यातील ६५२ मार्गांवर ‘शटल’ सेवा सुरू असून, त्या माध्यमातून उत्पन्नातही वाढ झालेली आहे.
वाहतूक व्यवस्थेतील स्पर्धेला तोंड देण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने आपल्या बससेवेत आमूलाग्र बदल केले आहेत. खासगी प्रवासी वाहतुकीच्या बससेवेच्या बरोबरीने महामंडळाने वातानुकूलित बसेस आणल्या, वायफाय सुविधा, व्हॉल्व्हो बसेस, आता तर बेंझर बस चालविण्याइतपत महामंडळ स्पर्धेत उतरले आहे. या बदलाचा मोठा भाग शहराशी संबंधित आहे. शहरात महामंडळाने अजूनही आव्हान कायम ठेवले आहे, परंतु आता ग्रामीण भागातही मंडळाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याचाच भाग म्हणून महामंडळाने कमी अंतराची ‘शटल बससेवा’ राज्यातील ६५२ मार्गांवर सुरू केली आहे.
खेडे गावांना तालुक्याला आणि तालुक्यास जिल्ह्याला जोडण्याची ही अभिनव संकल्पना आहे. त्यानुसार आता केवळ कमी अंतराच्या गाड्यांच्या प्रवासाकडेच लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. ५० ते ६० किलोमीटर अंतरावरील गावांसाठी दर अर्ध्यातासाने बस उपलब्ध होणार आहे. प्रवासी जादा असेल तर दर पंधरा मिनिटांनी बस सोडण्याचेदेखील नियोजन करण्यात आलेले आहे.  महामंडळाने पूर्वी केवळ लांब पल्ल्याच्या गाड्यांकडेच लक्ष केंद्रित केले होते. आता लहान अंतरावरील वाहतुकीकडे लक्ष देऊन महामंडळाने खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा-टॅक्सी आणि पिकअप व्हॅनपुढे आव्हान उभे केले आहे. या बसेस २४ ते ४८ फेऱ्या दररोज करणार आहेत. त्यामुळे खेड्यातून तालुक्याला जाणाऱ्यांना आता पूर्ण दिवस वाया घालवावा लागणार नाही तर तो पाहिजे तेव्हा तालुक्यात आणि पाहिजे तेव्हा गावात येऊ शकतो. या सेवेमुळे गेल्या जानेवारी - फेब्रुवारी महिन्यातच या उपक्रमाच्या माध्यमातून उत्पन्नात वाढ झाली आहे.  राज्यातील अर्ध्या गावांमध्ये ही योजना पूर्णक्षमतेने सुरू करण्यात आली आहे. कमी अंतराची गावे तालुक्याला जोडण्यात आल्यामुळे गावातील व्यापार, व्यवसायाला देखील चांगले दिवस आले आहेत. सुमारे १२०० गावे या शटल सेवेने जोडण्यात आल्याचा दावाही एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाने केला आहे.
लांबपल्ल्याच्या वाहतूक व्यवस्थेमुळे महामंडळाची ओळख निर्माण झाली, परंतु आता जवळच्या गावांसाठी एसटीची प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे. महामंडळाने लांब पल्ल्याच्या गाड्यांचा जास्त विचार न करता शहरांतर्गत असलेल्या गावांमध्ये वाहतूकप्रणाली विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. लांब पल्ल्यामध्ये एसटीला फारसे स्पर्धक नाहीत. शिवाय स्पर्धा असलेल्या ठिकाणी स्पर्धा करण्यासाठी खर्चही परवडणारा नसल्याने महामंडळाने कमी अंतराच्या गावांसाठीच जास्त गाड्यांच्या फेऱ्या वाढविल्या आहेत. रेल्वेच्या शटलप्रमाणेच महामंडळाने ‘शटल बससेवा’ सुरू केल्याने महामंडळाच्या उत्पन्नातही वाढ झाली आहे.
जनता बस ही संकल्पना आता हद्दपार करण्यात आली असून, हा शब्ददेखील गाड्यांना वापरण्यात येत नसल्याचे सूत्रांनी सांगितले. मागितल्या त्या ठिकाणी गाड्या पोहचविण्यात आलेल्या आहेत. शटल सेवेसाठीदेखील जास्तीत जास्त गावे जोडताना रेल्वेच्या शटलप्रमाणेच सेवा उपलब्ध व्हावी यासाठी गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.  लाल-पिवळी ही बसची ओळख कोणत्याही परिस्थितीत पुसली जाणार नाही, असा निश्चय करण्यात आल्याने सेवा आणि सुविधांबाबत महामंडळाने लक्ष केंद्रित केले आहे.  नाशिक जिल्ह्यात नाशिक-सिन्नर, नाशिक - सटाणा, नाशिक - मालेगाव, नाशिक - त्र्यंबकेश्वर, नाशिक - कळवण आदि मार्गांवर या बसेस सुरूदेखील झाल्या आहेत. यापैकी अनेक नावे आहेत. परंतु उदाहरणासाठी काही गावे प्रातिनिधिक स्वरूपात नोंदविली आहेत.   राज्य परिवहन महामंडळाने गेल्या काही दिवसांपासून आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसते. महापालिकांच्या हद्दीतील बससेवा तेथील महापालिकांनीच चालवावी, असे पत्र मंडळाकडून महापालिकांना पाठविले जात आहे. ग्रामीण भागातील खासगी प्रवासी वाहतुकीला आळा बसावा म्हणून ही ‘शटल सेवा’ सुरू करण्यात आली आहे.  लवकरात लवकर प्रवाशांना बस मिळाली तर ते खासगी वाहनांचा वापर करणार नाही या भावनेतून महामंडळाने ‘शटल’ सेवा’ म्हणजे थोड्याशा अंतरासाठीची तत्काळ प्रवासी सेवा सुरू केली आहे.

Web Title: 'Shuttle service' on 652 routes in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.