बहीण-भावाचा डबक्यात बुडून मृत्यू, सिन्नर तालुक्यातील घटना
By प्रसाद गो.जोशी | Published: May 2, 2024 01:19 AM2024-05-02T01:19:46+5:302024-05-02T01:20:34+5:30
मृतातील भाऊ पाच तर बहीणचार वर्षांची आहे.
शैलेश कर्पे -
सिन्नर : तालुक्यातील रामनगर येथे डबक्याजवळ खेळणाऱ्या बहीण भावाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. मृतातील भाऊ पाच तर बहीणचार वर्षांची आहे.
तालुक्यातील रामनगर येथे गावाजवळच असणाऱ्या डबक्याजवळ आयुष्य रवींद्र बंडकर(५) व धनश्री रवींद्र बंडकर(४) हे बहीण भाऊ आणि एक लहान मुलगा खेळत होते. यावेळी खेळताना पाय घसरून डबक्यात बुडून या दोघांचा मृत्यू झाला. सोबत खेळणारा मुलगा त्या ठिकाणी रडत बसला होता. गावात बस आल्यानंतर एक प्रवासी पायी जात असताना त्याला रडणारा मुलगा दिसला. या प्रवाशांने त्याच्याकडे विचारपूस केल्यानंतर दोन जण डब्यात बुडाल्याची माहिती समोर आली. या प्रवाशांने आरडाओरडा केल्यानंतर गावातील नागरिक मदतीसाठी धावून आले. या भाऊ बहिणीला डबक्यातून बाहेर काढण्यात आले. तातडीने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले तथापि त्यांचा मृत्यू झाला होता. या दोन्ही भावंडाचे आई-वडील मोल मजुरी करतात. वडील नांदूर शिंगोटे येथे कामावर गेले होते तर आई घरी होती.
घटनेची माहिती समजल्यानंतर रामनगर गावावर शोककळा पसरली. या दोन्ही लहान भावंडांचे मृतदेह सिन्नर नगरपरिषद रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक दिलीप राठोड, हवालदार हेमंत तांबडे यांनी पंचनामा केला.