मयत शिक्षिकेच्या बँक खात्यातून भावंडांनी लांबविले १७ लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2022 01:51 AM2022-07-06T01:51:12+5:302022-07-06T01:51:31+5:30
मुंढेगावाजवळ अपघातात जानेवारी महिन्यात ठार झालेल्या तिघा शिक्षकांपैकी एक मृत झालेल्या महिला शिक्षिकेच्या बँक खात्यातून तब्बल १७ लाख ३० हजार रुपयांचा परस्पर अपहार भावंडांनी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मयत शिक्षिकेच्या पतीने दिलेल्या तक्रारीवरून अंबड पोलिसांनी शिक्षिकेची बहीण व भावाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
नाशिक : मुंढेगावाजवळ अपघातात जानेवारी महिन्यात ठार झालेल्या तिघा शिक्षकांपैकी एक मृत झालेल्या महिला शिक्षिकेच्या बँक खात्यातून तब्बल १७ लाख ३० हजार रुपयांचा परस्पर अपहार भावंडांनी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मयत शिक्षिकेच्या पतीने दिलेल्या तक्रारीवरून अंबड पोलिसांनी शिक्षिकेची बहीण व भावाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील मुंढेगाव फाट्याजवळ ५ जानेवारी २०२२ साली झालेल्या कारच्या भीषण अपघातात तिघा शिक्षकांचा मृत्यू झाला होता. यामध्ये दोन पुरुष व एक महिला मयत पल्लवी नितीन जोशी उर्फ जोत्सना रमेश टिल्लू (४७) यांचा समावेश होता. पल्लवी यांच्या मृत्यूची बातमी मिळताच भाऊ संशयित योगेश टिल्लू व बहीण नेहा सोनटक्के हे दोघे सर्वप्रथम जिल्हा रुग्णालयात दाखल झाले जेव्हा मयत पल्लवी यांचा मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी हलविला तेव्हा त्यांची पर्स, मोबाइल हे त्यांची बहीण नेहा यांच्याकडे दिला. अंत्यविधीनंतर नेहा यांनी पर्स तपासली असता त्यात डायरी व मोबाइल हाती लागला. या डायरीत मयत शिक्षिकेने त्यांच्या बँकेच्या खात्याची सर्व माहिती नोंदवून ठेवलेली होती. तसेच शेअर्समध्ये गुंतवणूक असल्याचीही काही माहिती होती. या माहितीचा चोरट्या पद्धतीने गैरवापर करत संशयित नेहा व योगेश यांनी संगनमताने शेअर्सची खरेदी-विक्रीच्या माध्यमातून मिळालेली रक्कम परस्पर मोबाइल डिजिटल बँकिंगच्या माध्यमातून परस्पर ६ जानेवारी ते १७ फेब्रुवारीपर्यंतच्या कालावधीत तब्बल १७ लाख ३० हजार रुपयांचा अपहार केला, असे मयत पल्लवी यांचे पती फिर्यादी नितीन बाळकृष्ण जोशी (५२, रा. अंबड) यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार यांनी संशयित नेहा व योगेशविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांच्या बँक खात्याची माहितीदेखील मागविण्यात आली असून, पुढील तपास पवार करीत आहेत.
--इन्फो--
...असा झाला उलगडा
मयत पल्लवी या शिक्षिका होत्या. त्यांचे विल्होळी येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत बचत खाते होते. त्यांच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र प्राप्त झाले. यामुळे पती फिर्यादी नितीन जोशी यांनी ते प्रमाणपत्र बँकेत जमा करून बँकेच्या खातेदार मयत झाल्याचे कळविले. यावेळी व्यवस्थापक यांनी जेव्हा प्रमाणपत्रावरील मृत्यू दिनांक बघितला आणि सहज बँक खाते तपासले तेव्हा तेदेखील अवाक् झाले. कारण मृत्यूच्या दुसऱ्याच दिवशी या बँक खात्यावर आर्थिक व्यवहार झालेला आढळून आला. यावेळी हा उलगडा झाल्याचे पोलिसांनी सांगितले.