मालेगाव परिसरात रोगट हवामान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:30 AM2020-12-12T04:30:53+5:302020-12-12T04:30:53+5:30
------ मालेगाव कॅम्प भागात स्वच्छतेची मागणी मालेगाव : शहरातील कॅम्प भागात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. दैनंदिन स्वच्छतेला ...
------
मालेगाव कॅम्प भागात स्वच्छतेची मागणी
मालेगाव : शहरातील कॅम्प भागात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. दैनंदिन स्वच्छतेला टाळाटाळ केली जात आहे. रस्त्याच्या कडेला व मोकळ्या भूखंडांवर घाण व कचऱ्याचे ढीग दिसून येत आहे. महापालिकेने या भागात स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी केली जात आहे.
------
सोमवारी ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडत
मालेगाव : तालुक्यातील ९९ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होऊ घातली आहे. या पार्श्वभूमीवर वॉर्ड रचना व प्रारूप मतदार याद्या तयार करण्यात आल्या आहेत. सन २०२० ते २०२५ साठी सरपंचपदाची आरक्षण सोडत सोमवारी (दि. १४) तहसील कार्यालयात सकाळी ११ वाजता जाहीर करण्यात येणार आहे.
------
मनपा कर्मचाऱ्यांना फेब्रुवारीपासून सातवा वेतन आयोग
मालेगाव : महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी २०२१ पासून सातवा वेतन आयोग लागू केला जाणार आहे. यासाठी महापालिकेने वेतन निश्चिती केली असून, हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. २०२१ पासून सातवा वेतन आयोगासह मासिक वेतन दिले जाणार आहे. १०८९ कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे.
------
वाहतूकदारांच्या संपामुळे यंत्रमाग व्यवसाय अडचणीत
मालेगाव : कापड वाहतूक करणाऱ्या वाहनाला प्रतिकापड गाठ १२० रुपये भाडेवाढ द्यावी, या मागणीसाठी मालेगाव तालुका ट्रक, चालक, मालक संघटनेने संप पुकारला आहे. गेल्या ४ दिवसांपासून सुरू असलेल्या संपामुळे ट्रान्सपोर्टच्या गुदामांमध्ये कापड गाठी पडून आहेत. मालेगाव ग्रे क्लॉथ मर्चंट असोसिएशनने भाडेवाढीस नकार दिला आहे. त्यामुळे तोडगा निघत नाही तोपर्यंत गाठी पडून राहणार आहेत.
--------
पोलीस कवायत मैदानावर अस्वच्छता
मालेगाव : शहरातील पोलीस कवायत मैदानावर मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या ठिकाणी सायंकाळच्या सुमारास चायनिज व इतर खाद्यपदार्थांच्या गाड्या लागत असतात. गाडीचालक कचरा उचलतात; मात्र काही बेजबाबदार नागरिक मैदानावरच घाण टाकून निघून जातात. मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.