सिद्ध पिंप्रीत उद्या गाव बंद; मोटरसायकल रॅली
By Sandeep.bhalerao | Published: October 31, 2023 04:33 PM2023-10-31T16:33:20+5:302023-10-31T16:34:06+5:30
राजकारण्यांना गावबंदी केल्यानंतर आता गुरुवारी (दि.२) रोजी गाव बंद ठेवण्यात येणार आहे.
नाशिक : मराठा आरक्षण आंदोलनाचा लढा राज्यभर अधिक तीव्र होत असून सिद्ध पिंप्रीतील ग्रामस्थांनीही आंदोलनाची पुढील दिशा निश्चित केली आहे. यापूर्वी राजकारण्यांना गावबंदी केल्यानंतर आता गुरुवारी (दि.२) रोजी गाव बंद ठेवण्यात येणार आहे. गावातील सर्व दुकाने व उद्योगधंदे बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बंदनंतर मोटर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले असून सकाळी साडेआठ वाजता सर्व समाज बांधव गणपती मंदिर येथे जमा होऊन त्याचप्रमाणे सिद्ध पिंप्रीतून रॅली निघणार आहे.
मोटर सायकलला भगवे ध्वज लावून सिद्ध पिंप्रीतून मोटर सायकल रॅलीला सुरुवात होऊन लाखलगाव कालवी, गंगा पाडळी, ओढा, शिलापूर, माडसांगवी त्याचप्रमाणे नांदूर मानूर येथून नांदूर नाकामार्गे कोर्टासमोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मराठा आंदोलकांच्या उपोषणास्थळी रॅलीचा समारोप होईल. ज्या गावांमध्ये रॅली पोहोचेल तेथीलही मराठा समाज बांधव या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. सिद्ध पिंप्री ग्रामस्थांच्यावतीने जास्तीत जास्त मराठा युवकांनी व समाज बांधवांनी या रॅलीमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन सिद्ध पिंप्री ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.