ठेंगोडाच्या सिद्धिविनायकाचे भाविकांना केवळ मुखदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2021 10:36 PM2021-03-02T22:36:56+5:302021-03-03T00:50:41+5:30
लोहोणेर : अंगारकी चतुर्थीचा योग यंदाच्या कॅलेंडर वर्षात प्रथमच आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर दीड वर्षाने जुळून आला. मात्र, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मंदिर ट्रस्टने केलेल्या आवाहनामुळे ठेंगोडा येथील सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची संख्या रोडावल्याचे दिसून आले.

अंगारकी चतुर्थी म्हणजे श्रींच्या दर्शनासाठी भाविकांसाठी पर्वणी असते. अंगारकीला गणेशभक्त बाप्पाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच मंदिरात गर्दी करीत असतात. मात्र यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ठेंगोडा येथील सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची कमी गर्दी दिसून आली.
गाभाऱ्यात गर्दी न करता बाहेरून श्रींचे दर्शन घ्यावे, या ट्रस्टने केलेल्या आवाहनाला भाविकांनी प्रतिसाद दिला. अंगारकीनिमित्त मंगळवारी पहाटे ४.३० वाजता सटाणा न्यायालयाचे न्यायाधीश आव्हाड यांच्या हस्ते सपत्निक बाप्पांची महापूजा करण्यात आली. त्यानंतर गाभारा बंद करून सर्वांना श्रींच्या मुखदर्शनाची व्यवस्था करण्यात आली.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेला व नवसाला पावणारा गणपती म्हणून स्वयंभू सिद्धिविनायकाची सर्वत्र ख्याती आहे. अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने मंदिराच्या परिसरात मोठी यात्रा भरत असते. यंदा श्रींचा गाभारा दर्शनासाठी बंद असला तरी पूजासाहित्य व फराळाची दुकाने थाटण्यात आलेली होती. यंदा महाप्रसादाचे वाटपही ट्रस्टच्या वतीने बंद करण्यात आले होते.
फोटो - ०२ लोहोणेर गणपती-१/२
अंगारकी चतुर्थी निमित्ताने ठेंगोडा येथील सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी ट्रस्टच्या वतीने भाविकांना श्रींचे मुखदर्शन देण्यात आले. चौकटीत श्री सिद्धिविनायकाची मूर्ती.