खंडित वीजपुरवठ्याने सिडकोवासीय हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 12:51 AM2018-06-14T00:51:48+5:302018-06-14T00:51:48+5:30
परिसरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असून, विजेचा प्रश्न तत्काळ सोडविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
सिडको : परिसरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असून, विजेचा प्रश्न तत्काळ सोडविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून सिडको व परिसरात वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने व ५ ते ६ तास उलटूनही अधिक काळ वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळा सुरू होण्याअगोदरच विजेचा खेळ खंडोबा सुरू झालेला आहे. दि. ५ जून रोजी गंगापूररोड परिसरामध्ये तब्बल ११ तास वीजपुरवठा खंडित झालेला होता, तर इंदिरानगर परिसरातदेखील सोमवारी रात्री जवळपास दोन ते अडीच तास वीजपुरवठा खंडित झालेला होता तसेच बुधवारी रात्रीच्या वेळेत झालेल्या पावसामुळे सिडको परिसरामध्येदेखील वीजपुरवठा खंडित झाला होता. सततच्या वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रकारामुळे नागरिकांची गैरसोय होत असून, दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी विजेचा शॉक लागून नागरिकांचा बळी जात असल्याच्या घटना घडल्या आहेत. वीज दुरुस्तीची कामे करताना ज्या परिसरात काम करावयाचे आहे त्याची आगाऊ सूचना वर्तमानपत्रातून नागरिकांना देण्यात यावी, किती तास वीजपुरवठा खंडित ठेवावा लागेल याचीदेखील माहिती नागरिकांना उपलब्ध करून देण्यात यावी. दुरुस्तीच्या नियोजनाव्यतिरिक्त वीजपुरवठा खंडित करू नये अशा सूचना सर्व विभागीय अधिकाऱ्यांना देण्यात याव्यात, अशी मागणी आमदार सीमा हिरे यांनीदेखील निवेदनाद्वारे केली आहे.