सेंट्रल वेअरहाउसला चोहोबाजूंनी सुरक्षा व्यवस्थेचा वेढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2019 01:17 AM2019-05-01T01:17:45+5:302019-05-01T01:18:03+5:30
अंबडच्या सेंट्रल वेअरहाउस येथे नाशिक व अंबड लोकसभेसाठी दोन स्वतंत्र गुदामाचा वापर स्ट्राँगरूम म्हणून करण्यात आला आहे. हे दोन्ही गुदाम लागूनच आहेत. या गुदाममध्ये दोन मोठे दरवाजे आहेत. त्यापैकी एक दरवाजा पूर्णपणे बंद करण्यात आला असून, प्रमुख गेटवर तीन मोठी कुलपे लावून सील बंद करण्यात आले आहे.
नाशिक : अंबडच्या सेंट्रल वेअरहाउस येथे नाशिक व अंबड लोकसभेसाठी दोन स्वतंत्र गुदामाचा वापर स्ट्राँगरूम म्हणून करण्यात आला आहे. हे दोन्ही गुदाम लागूनच आहेत. या गुदाममध्ये दोन मोठे दरवाजे आहेत. त्यापैकी एक दरवाजा पूर्णपणे बंद करण्यात आला असून, प्रमुख गेटवर तीन मोठी कुलपे लावून सील बंद करण्यात आले आहे.
या दोन्ही गुदामाच्या चारही बाजूंनी कटेकोट बंदोबस्त आहे. दोन्ही स्ट्राँगरूम त्रिस्तरीय सुरक्षाव्यवस्थेने वेढले आहे. सर्व प्रथम जे मुख्य गुदाम आहे, ते केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाची सुरक्षा आहे. त्यानंतर चारही बाजूंनी राज्य राखीव पोलीस दल आहे आणि सेंट्रल वेअरहाउसच्या बाहेरच्या बाजूला स्थानिक पोलिसांचा वेढा आहे. याशिवाय चारही बाजूंनी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत.
कोणाला घेता येणार सुरक्षेचा आढावा?
सेंट्रल वेअरहाउसच्या स्ट्राँगरूममध्ये ईव्हीएम ठेवण्यात आल्या आहेत. त्या परिसरात कुणालाही जाण्याची परवानगी नाही. परंतु लोकसभा निवडणुकीतील उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींना ईव्हीएम सुरक्षित आहेत किंवा नाही, याचा आढावा घ्यायचा असेल तर त्यांना ते पाहता येऊ शकेल. परंतु त्याची रीतसर परवानगी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी येथे एक लॉग बुकसुद्धा ठेवलेले आहे.
ज्या स्ट्राँगरूममध्ये ईव्हीएम ठेवण्यात आले आहेत, तिथे आयोगाच्या निर्देशानुसार कुठल्याही प्रकारची लाइव्ह वायरिंग नाही. म्हणजे संपूर्ण गुदाम हे अंधारात राहील. आतमध्ये लाइटसुद्धा नाही.