पोषण पुनर्वसन केंद्र सुरू करण्याची मागणी शल्यचिकित्सकांना निवेदन : सीमंतिनी कोकाटे यांचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 12:11 AM2018-04-11T00:11:39+5:302018-04-11T00:11:39+5:30
सिन्नर : घरापासून दूर असलेल्या जिल्हा रुग्णालयातील पोषण पुनर्वसन केंद्रात कुपोषित बालकांना दाखल करताना होणारी गैरसोय लक्षात घेता पालक बालकांना दाखल करण्यास तयार होत नाहीत.
सिन्नर : घरापासून दूर असलेल्या जिल्हा रुग्णालयातील पोषण पुनर्वसन केंद्रात कुपोषित बालकांना दाखल करताना होणारी गैरसोय लक्षात घेता पालक बालकांना दाखल करण्यास तयार होत नाहीत. त्यामुळे कुपोषित बालकांना वेळीच उपचार न मिळाल्याने त्यांची प्रकृती आणखी खालावते. ही बाब लक्षात घेऊन जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमधील ग्रामीण रुग्णालयात पोषण पुनर्वसन केंद्र सुरू करावे, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे यांनी केली आहे. कुपोषित बालकांच्या उपचारासाठी कोकाटे या गेल्या महिनाभरापासून मोहीम राबवित असून, त्यांनी अनेक बालके नाशिकला दाखल केली आहेत. जिल्ह्यात कुपोषित बालकांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून आल्यानंतर जिल्हा परिषदेने नियोजन करून सुमारे अडीचशे ग्राम बालविकास केंद्रे स्थापन केली आहेत, तर जिल्हा रुग्णालयात पोषण पुनर्वसन केंद्र सुरू केले आहे. या ठिकाणी अतिगंभीर तीव्र कुपोषित बालकांना दाखल केले जाते. परंतु संबंधित बालकांच्या पालकांना कुपोषित बाळाला जिल्हा रुग्णालयातील केंद्रात आणणे आणि येथेच थांबणे शक्य होत नसल्यामुळे कुपोषण निर्मूलनाच्या मोहिमेला काही प्रमाणात खीळ बसत आहे. त्यामुळे सर्वच तालुक्यांमध्ये कुपोषित बालकांची सोय होईल म्हणून ग्रामीण रुग्णालयात पोषण पुनर्वसन केंद्र सुरू करण्याची मागणी शिव सरस्वती फाउंडेशनच्या अध्यक्ष सीमंतिनी कोकाटे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांच्याकडे केली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक कुपोषण असताना एनआरसीमध्ये फक्त २० बेडची सोय असल्याने बेड फुल झाल्यावर इतर बालकांना गरज असूनही उपचार घेण्यासाठी दाखल करता येत नाही. त्यामुळे तालुका ग्रामीण रुग्णालयामध्ये एनआरसीची सोय करणे अत्यंत आवश्यक असल्याचे कोकाटे यांनी निदर्शनास आणून दिले. यावेळी सीमंतिनी कोकाटे यांच्या समवेत अरु ण वाघ, प्रभाकर हारक, भास्कर चव्हाणके, अरुण दळवी, बापू डांगे, योगेश घोटेकर आदी उपस्थित होते.