ऐक्याचे दर्शन : ‘इमामशाही’च्या ताबुताचे कारागिर मुस्लीम तर खांदेकरी हिंदू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 01:41 PM2018-09-20T13:41:05+5:302018-09-20T16:39:29+5:30
धार्मिक सण-उत्सव, यात्रा म्हटलं की त्यासोबत परंपरा ही जुळलेली असतेच अन् अशा परंपराच त्यांचे वैशिष्ट्य ठरतात, पारंपरिक प्रथांमधून आजही भारताची एकात्मता अधिकाधिक बळकट होताना दिसून येते. नाशिकच्या ‘इमामशाही’ दर्गा परिसरात दरवर्षी होणारा मुहर्रमचा उत्सव अन् त्याची परंपरा राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक मानली जाते.
अझहर शेख, नाशिक : येथील सारडासर्कल भागातील हजरत इमामशाही दर्ग्याच्या आवारात दरवर्षी इस्लामी नववर्षाच्या पहिल्या महिन्यात अर्थात 'मुहर्रम'मध्येहिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन पारंपरिक प्रथेतून घडते. येथे मानाचा अळीवच्या हिरवळीचा ताबूत उभारला जातो. या ताबूताचे कारागिर जरी मुस्लीम असले तरी पारंपरिक प्रथेप्रमाणे मुहर्रमच्या दहा तारखेला (आशुरा दिन) ताबूतचे खांदेकरी होण्याचा मान आदिवासी कोळी हिंदू बांधवांना दिला जातो. उद्या शुक्रवारी (दि.२१) दर्ग्याच्या आवारात यात्रा भरणार असून ताबूत दर्शनासाठी दूपारी चार वाजेनंतर मैदानात हिंदू भाविक घेऊन येतील.
बांबूंच्या कामट्यांचा वापर करत त्याभोवती कापूस लावून कापसात अळीवच्या बियांची पेरणी आठवडाभरापुर्वी करण्यात आली होती. यावर दररोज पाण्याचा फवारा मारला जात होता. हिरवळीने ताबूत सजला आहे.
धार्मिक सण-उत्सव, यात्रा म्हटलं की त्यासोबत परंपरा ही जुळलेली असतेच अन् अशा परंपराच त्यांचे वैशिष्ट्य ठरतात, पारंपरिक प्रथांमधून आजही भारताची एकात्मता अधिकाधिक बळकट होताना दिसून येते. नाशिकच्या ‘इमामशाही’ दर्गा परिसरात दरवर्षी होणारा मुहर्रमचा उत्सव अन् त्याची परंपरा राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक मानली जाते. येथे अळीवच्या बियांपासून मुस्लीम कुटुंबीय हिरवळीचा ताबूत तयार करतात अन् आशुरा’च्या दिनी अर्थात मुहर्रमला हिंदू कोळी बांधव या ताबुताचे खांदेकरी होतात, यावेळी जातीधर्माच्या सर्व भिंती भेदल्या जातात अन् जातीय सलोख्याचे दर्शन घडते.
नाशिक शहरातील जुने नाशिक या गावठाण भागातील सारडा सर्कल येथे शेकडो वर्षे जुनी हजरत सय्यद इमामशहा बाबा यांची दर्गा आहे. या दर्ग्याच्या प्रांगणात मुहर्रमच्या पिहल्या दहा दिवसांमध्ये एक आगळा उत्सव दरवर्षी बघावयास मिळतो. हिंंदू-मुस्लीम भाविक ‘मुहर्रम’ च्या नऊ व दहा तारखेला या ठिकाणी सकाळ-संध्याकाळ हजेरी लावून ताबुतापुढे प्रार्थना करतात. या तीन दिवसांमध्ये येथे यात्रोत्सव भरविला जातो. या यात्रोत्सवाचे प्रमुख आकर्षण असते ते म्हणजे अळीवच्या बियांपासून तयार झालेला व हिरवळीने नटलेला आकर्षक ताबूत. हा ताबूत वर्षानुवर्षांपासून येथील सय्यद कुटुंबीय तयार करत आले आहे अन् या ताबुताचे मानकरी म्हणून खांदेकरीच्या भूमिकेत हिंदू कोळी बांधव राहिले आहेत. या शेकडो वर्षे जुन्या पारंपरिक प्रथेतून आजही हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन घडल्याशिवाय राहत नाही. ‘आशुरा’ दिवशी शहीद-ए-आझम हजरत सय्यद इमाम हुसेन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मुस्लीम समाजबांधव सामूहिकरीत्या शरबत, दूध कोल्ड्रिंक्सचे प्रसाद म्हणून वाटप करतात. या दिवशी इमामशाही दर्गाच्या आवारात हिंदू बांधव हिरवळीच्या ताबुताचे खांदेकरी होऊन संध्याकाळी पाच वाजेपासून तर दहा वाजेपर्यंत अनवाणी पायाने उभे राहतात.