भाजप-सेना, मनसे महायुतीचे गिरीश महाजन यांचे संकेत
By संजय पाठक | Published: October 22, 2022 02:39 PM2022-10-22T14:39:12+5:302022-10-22T14:40:05+5:30
राजकारणात काहीही अशक्य नसते असे सांगून भाजप नेते गिरीश महाजन यांनी महायुतीचे संकेत दिले आहेत.
संजय पाठक, नाशिक: राज्यातील सत्ता समिकरणे सतत बदलत असून शुक्रवारी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र आल्याने वेगळ्या महायुतीची चर्चा सुरू झाली आहे. राजकारणात काहीही अशक्य नसते असे सांगून भाजप नेते तसेच राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी महायुतीचे संकेत शनिवारी (दि.२२) दिले आहेत.
एका खासगी कार्यक्रमानिमित्त गिरीश महाजन शनिवारी (दि.२२) नाशिकमध्ये आले आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे संकेत दिले आहेत. अर्थात मनसेच्या दिपोत्सवाच्या निमित्ताने तीन्ही नेते एकत्र आले असले तरी त्याकडे राजकारण बघण्याचे कारण नाही असेही ते म्हणाले. सध्या तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप एकत्र आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील असे महाजन म्हणाले.
यंदा मुंबई महापालिकेत भाजपचीच सत्ता येणार याचा पुनरूच्चार करताना त्यांनी शिवसेना ठाकरे गटातील नाराजीवर भाष्य केले. मिलींद नार्वेकर हे नाराज आहेत, अशी माहिती आहे. त्यांचे आणि भाजप नेते अमित शहा यांचे चांगले संबंध आहेत. सध्या शिवसेनेत कोण येईल काेण जाईल हे सांगता येत नाही असेही ते म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"