मनेगाव फाटा येथे सिग्नल, गतिरोधकाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 12:16 AM2018-02-25T00:16:50+5:302018-02-25T00:16:50+5:30
नाशिक -पुणे महामार्गावर मनेगाव फाटा येथे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या अपघात प्रवणक्षेत्रात सिग्नल बसविण्याची मागणी ग्रामस्थांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
सिन्नर : नाशिक -पुणे महामार्गावर मनेगाव फाटा येथे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या अपघात प्रवणक्षेत्रात सिग्नल बसविण्याची मागणी ग्रामस्थांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केली आहे. मनेगाव फाट्यावर वारंवार अपघात होत असल्याने अनेक निष्पाप प्रवाशांना आपला जीव गमवावा लागत आहे. प्रचंड वेगाने धावणाºया वाहनांना लगाम घालण्यासाठी या ठिकाणी सिग्नल यंत्रणा आणि गतिरोधक बसविण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. नाशिक-पुणे महामार्गावर बायपास वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्यानंतरही सिन्नर-संगमनेर रस्त्यावर वाहनांची वर्दळ कायम आहे. मनेगाव फाट्याजवळ धोकादायक वळण आहे. समोरून येणाºया वाहनांचा अंदाज येत नाही. त्यातच परिसरात पथदीप नसल्याने सर्वत्र अंधाराचे साम्राज्य आहे. त्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. तहसीलदार नितीन गवळी यांना ग्रामस्थांनी मागण्यांचे निवेदन दिले. वाहनचालक भरधाव जातात. मनेगाव फाट्याजवळील देवनदीवरील संरक्षक कठडे तुटले आहेत. त्यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना व अपघात होण्याची शक्यता आहे. संभाव्य अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने मनेगाव फाट्याजवळ गतिरोधक आणि सिग्नल यंत्रणा उभारण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.गेल्या पंधरा दिवसांत मनेगाव फाट्यावर दोन अपघात झाले असून, त्यात चार निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.