वाहतूक बेटांच्या ठिकाणी उभारणार सिग्नल
By Admin | Published: August 19, 2014 12:29 AM2014-08-19T00:29:54+5:302014-08-19T01:22:07+5:30
वाहतूक बेटांच्या ठिकाणी उभारणार सिग्नल
उशिरा सुचले शहाणपण : शहरात दहा ठिकाणी होणार व्यवस्था; कोंडी सुटण्यास मदतनाशिक : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियमनाचा एक भाग म्हणून शहरात दहा ठिकाणी वाहतूक सिग्नल उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे शहराच्या अनेक भागात वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
सध्या शहराच्या अनेक भागात वाहतुकीची कोंडी होत असून, त्यासाठी महापालिकेने वाहतूक बेटे तयार करण्याची तयारी केली. सुमारे वीस वाहतूक बेटे प्रायोजकांच्या माध्यमातून विकसित करण्यात येणार आहेत. तथापि, अनेक ठिकाणी वाहतूक बेट हेच अडथळा ठरत आहे. वर्तुळाकार असलेल्या वाहतूक बेटांमुळे एका बाजूची वाहतूक सुरू असताना अन्य तीन ठिकाणची वाहतूक ठप्प होते. त्यातही वाहतूक बेटे उभारणारे सुरुवातीला उत्साह दाखवतात आणि नंतर मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने वाहतूक बेटांना अवकळा येते. वाहतूक बेटामुळे मुख्यत: वाहतुकीला होणारा अडथळा ही समस्या गंभीर होते. अशोकस्तंभसारख्या चौकात ही अडचण ठळकपणे दिसतेच; परंतु वाहतूक बेट असलेल्या शहरातील अन्य चौकांत यापेक्षा वेगळी स्थिती नाही.
परिणामी गेल्या वर्षभरात प्रायोजकांना शोधून वाहतूक बेटे साकारणाऱ्या महापालिकेने आता अशा बेटांच्या ठिकाणी वाहतूक सिग्नल बसविण्याची तयारी केली असून, त्यासाठी एक कोटी रुपये खर्चाच्या निविदा काढल्या आहेत. त्यानुसार जुना गंगापूर नाका, एबीबी सर्कल, बीवायके कॉलेज चौक या ठिकाणी वाहतूक बेट असतानादेखील सिग्नल बसविण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे शिवाजीनगर (नाशिकरोड), अनुराधा थिएटर, आरटीओ कॉर्नर, तारवालानगर, त्रिमूर्ती चौक, सिटी सेंटर मॉल याठिकाणी सिग्नल बसविण्यात येत आहेत. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्याच्या आत हे सिग्नल बसविण्यात येणार असल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)