सिग्नलची डावी वळणे नावालाच...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 11:35 PM2017-08-20T23:35:34+5:302017-08-21T00:20:13+5:30
सिग्नलवरील चारही दिशांच्या डाव्या बाजूचे वळण घेताना सिग्नल लागू पडत नाही. कारण डावे वळण सिग्नलवरील वाहतूक कोंडी तसेच अत्यावश्यक व आपत्कालीन स्थितीत महत्त्वाची भूमिका बजावतात; मात्र नाशिकच्या सिग्नलवरील डावी वळणे केवळ नावापुरतीच असल्याचे चित्र आहे. शहरातील प्रमुख मोठ्या सिग्नलवरील डावी वळणे खुली राहत नसल्यामुळे अनेकदा सर्वसामान्यांपासून तर रुग्णवाहिका, अग्निशामक बंबही अडकून पडतात.
अझहर शेख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : सिग्नलवरील चारही दिशांच्या डाव्या बाजूचे वळण घेताना सिग्नल लागू पडत नाही. कारण डावे वळण सिग्नलवरील वाहतूक कोंडी तसेच अत्यावश्यक व आपत्कालीन स्थितीत महत्त्वाची भूमिका बजावतात; मात्र नाशिकच्या सिग्नलवरील डावी वळणे केवळ नावापुरतीच असल्याचे चित्र आहे.
शहरातील प्रमुख मोठ्या सिग्नलवरील डावी वळणे खुली राहत नसल्यामुळे अनेकदा सर्वसामान्यांपासून तर रुग्णवाहिका, अग्निशामक बंबही अडकून पडतात. शहराच्या सिग्नवरील टायमर मॅनेजमेंट टिकवून ठेवण्यासाठी तसेच वाहतूक कोंडी टाळण्याकरिता आणि अत्यावश्यक, आपत्कालीन स्थितीत तत्काळ वाहनांना मार्ग मोकळा मिळण्यासाठी डावी वळणे खुली असणे गरजेची ठरतात. नाशिकच्या सिग्नवरील सर्वच डाव्या वळणांना जणू कायमस्वरूपी अतिक्रमणसह बेशिस्त चालक आणि वाहतूक नियंत्रण शाखेसह महापालिका प्रशासनाच्या उदासीनतेचे ग्रहण लागले असल्याचे बोलले जात आहे. कारण सिग्नल ‘लाल’ झाल्यानंतर वाहने थांबण्यास सुरुवात होते. कुठे ५५, तर कुठे ६५, कुठे ८५, तर कुठे ९२ सेकंदांपर्यंत सिग्नल ‘लाल’ असतो. वाहतूक नियंत्रणासाठी ते आवश्यकही आहे. अशावेळी वाहनांची रांग लागते ही रांग टाळण्यासाठी डावी वळणे खुली राहणे गरजेचे आहे.
जिल्हा रुग्णालयाची वाट व्हावी सुकर
शहरातील प्रमुख सिग्नल ज्यांचा थेट संबंध जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या दिशेने जाणाºया वाटेशी येतो त्या सिग्नलवर तरी किमान डावी वळणे खुली राहतील यासाठी शहर वाहतूक शाखा, महापालिका प्रशासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. यामध्ये कॅनडा कॉर्नर, टिळकवाडी सिग्नल, त्र्यंबकरोडवरील वन कार्यालयाचा सिग्नल, तरण तलाव सिग्नल, सिडको मार्गावरील उंटवाडी सिग्नल, जेहान सिग्नल, सीबीएस सिग्नल, त्र्यंबक नाका हॉली क्रॉस चर्च सिग्नल, गडकरी चौक सिग्नलच्या चारही डाव्या बाजूंची वळणे सुरक्षितपणे वाहतुकीसाठी खुली कशी राहतील, यादृष्टीने तजवीज करण्याची मागणी होत आहे.
वाहतूक नियंत्रण शाखा उदासीन
वाहतूक शाखेकडून यासंदर्भात कुठल्याही उपाययोजना अथवा नागरिकांचे प्रबोधन केले जात नसल्यामुळे वाहनचालक थेट डाव्या वळणावरच वाहने आणून उभी करतात. यामुळे डावी वळणे जोपर्यंत सिग्नल खुला होत नाही तोपर्यंत बंद होतात. परिणामी सिग्नलवर थांबलेल्या वाहनांपैकी ज्यांना डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचे आहे त्यांनाही थांबून रहावे लागते आणि वाहतूक कोंडीला निमंत्रण मिळते. तसेच सिग्नलवरील मर्यादित वेळेत जेवढी वाहने निघून जायला हवी तेवढी जात नाही तोच पुन्हा सिग्नल ‘लाल’ होतो. एकूणच डाव्या वळणांचा श्वास गुदमरल्यामुळे सिग्नलचे ‘टाइम मॅनेजमेंट’ही धोक्यात आले आहे.
नव्या सिग्नलवरही दाखवावे गांभीर्य
दिवसेंदिवस शहराची वाढती लोकसंख्या आणि रस्त्यावर धावणाºया वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता काही प्रमुख नऊ चौकांमध्ये नव्याने सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. महापालिका व पोलीस प्रशासनाकडून अशा चौकांची पाहणीदेखील केली गेली आहे. या चौकांमध्येदेखील सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करताना डाव्या वळणांच्या ‘सुरक्षितते’बाबत दक्षता घेणे गरजेचे आहे. अन्यथा या सिग्नलवरही ‘देखावा’ पहावयास मिळेल, असे नाशिककरांचे म्हणणे आहे.