आरोेग्य, कृषी विभागांतील बदल्यांवर शिक्कामोर्तब
By admin | Published: May 20, 2015 01:38 AM2015-05-20T01:38:26+5:302015-05-20T01:41:16+5:30
आरोेग्य, कृषी विभागांतील बदल्यांवर शिक्कामोर्तब
नाशिक : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची कार्यवाही काल (दि.१९) दुसऱ्या दिवशीही सुरूच होती. काल आरोग्य विभागासह कृषी विभागातील बदल्यांची कार्यवाही करण्यात आल्याचे कळते. यातही आरोग्य विभागातील एका संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची कार्यवाही सुरू असतानाच अचानक शेवटच्या बदलीप्रसंगी कार्यवाही रोखण्यात आल्याची चर्चा आहे. काल सकाळपासूनच आरोग्यसेवक, आरोग्य सेविका, आरोग्य सहायक, सहायिका, औषध निर्माण अधिकारी, आरोग्य विस्तार अधिकारी, कुष्ठरोग तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, अशा एकूण १०५ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची कार्यवाही करावयाची होती. त्यातील पेसा कार्यक्षेत्रात येणाऱ्या शंभर टक्के कर्मचाऱ्यांची कार्यवाही करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. सोमवारी झालेल्या बदल्यांमध्ये सामान्य प्रशासन विभागातील कक्ष अधिकारी या संवर्गातील दोन प्रशासकीय बदल्यांची कार्यवाही करण्यात आली. तर कार्यालयीन अधीक्षक संवर्गातील प्रशासकीय तीन, तर विनंती स्वरूपातील दोन बदल्यांची कार्यवाही करण्यात आली. विस्तार अधिकारी संवर्गातील तीन कर्मचाऱ्यांचे समायोजन करावयाचे असताना प्रत्यक्षात पाच विस्तार अधिकाऱ्यांचे समायोजन करण्यात आले. वरिष्ठ सहायक (लेखा)संवर्गातील प्रशासकीय स्वरूपातील १३, तर विनंती स्वरूपातील तीन बदल्यांची कार्यवाही करण्यात आली, तर कनिष्ठ सहायक संवर्गातील प्रशासकीय स्वरूपात ४१, तर विनंती स्वरूपात चार बदल्यांची कार्यवाही करण्यात आली. बुधवारी (दि.२०) बांधकाम विभागासह लघुपाटबंधारे विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची कार्यवाही करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)