बागलाण तालुक्यात रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 10:22 PM2021-04-04T22:22:13+5:302021-04-05T00:43:55+5:30
सटाणा : बागलाण तालुक्यासह सटाणा शहरात कोरोनाने अक्षरशः कहर केला आहे . कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दिवसाला रुग्णांच्या संख्येत २५ ते ३० ने वाढ होत असल्याने भीतीचे वातावरण आहे. तब्बल १२८२ बाधित रुग्णांवर उपचार सुरू असून, सात दिवसांत ९ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. दिवसाला सरासरी १०० रुग्ण कोरोनाबाधित आढळत असून, सर्वाधिक संख्या सटाणा, नामपूर, ताहाराबाद, लखमापूर, ब्राह्मणगाव, मुल्हेर, जायखेडा, ठेंगोडा परिसरात आहे.
सटाणा : बागलाण तालुक्यासह सटाणा शहरात कोरोनाने अक्षरशः कहर केला आहे . कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दिवसाला रुग्णांच्या संख्येत २५ ते ३० ने वाढ होत असल्याने भीतीचे वातावरण आहे. तब्बल १२८२ बाधित रुग्णांवर उपचार सुरू असून, सात दिवसांत ९ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. दिवसाला सरासरी १०० रुग्ण कोरोनाबाधित आढळत असून, सर्वाधिक संख्या सटाणा, नामपूर, ताहाराबाद, लखमापूर, ब्राह्मणगाव, मुल्हेर, जायखेडा, ठेंगोडा परिसरात आहे.
बागलाण तालुक्यात कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता दुसरी लाट असल्याचे बोलले जात आहे. सुरू असलेल्या शाळा, बस, प्रवासी वाहतूक, लग्न, अंत्ययात्राप्रसंगी होणारी गर्दी आणि आरोग्य यंत्रणेने घालून दिलेल्या नियमांची होत असलेली पायमल्ली यामुळे मोठ्या प्रमाणात रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. या आठ दिवसांत शहरात कोरोनाबाधितांची संख्या साडेतीनशेवर गेली आहे. भाक्षी रोढ, नामपूर रोड, पिंपळेश्वर रोड या परिसरात बाधितांची संख्या सर्वाधिक आहेत. शहरापाठोपाठ लखमापूर, ब्राह्मणगाव, नामपूर, ताहाराबाद, जायखेडा, मुल्हेर, कोटबेल, बिजोरसे, टेंभे, ठेंगोडा, चौंधाणे, अंतापूर, बिजोटे, कुपखेडा, द्याने, उत्राणे, दरेगाव, आसखेडा, सोमपूर या गावांमध्ये झपाट्याने रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे.
तालुक्यात आठ दिवसांतच बाधितांची संख्या हजारी पार झाली असून, तब्बल १२८२ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, सात दिवसांत ९ जणांचा कोरोनाने बळी घेतला असून, त्यामध्ये सटाणा, जायखेडा, ठेंगोडा, मळगाव आणि आनंदपूर येथील रुग्णांचा समावेश आहे.
उदासीन प्रशासनामुळे रुग्णांची हेळसांड
बागलाण तालुक्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. रुग्णसंख्या विचारात घेता सुविधा अपुर्या असल्याची ओरड आहे. तालुक्यात डांगसौंदाणे येथे ३८ बेडचे कोविड हॉस्पिटल आहे. प्रत्येक बेडला ऑक्सिजनची सुविधा आहे, तर शहरातील नामपूर रस्त्यावरील शासकीय वसतिगृहात कोविड केअर सेंटर उभारण्यात आले असून, २०० बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र रुग्णांवर वेळीच उपचार होत नसल्यामुळे दगावण्याचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ऑक्सिजनअभावी सहा जणांचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता मोसम पट्ट्यातील रुग्णांसाठी नामपूर येथे स्वतंत्र कोविड हॉस्पिटल व तळवाडे भामेर शासकीय आश्रमशाळेत केअर सेंटर उभारण्याची मागणी आमदार दिलीप बोरसे यांनी पालकमंत्री छगन भुजबळ, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्याकडे केली होती. मात्र कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. जिल्हा प्रशासनाच्या उदासीनतेमुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होऊन रुग्ण दगावत आहेत.
कारवाईचा फार्स
सटाणा पालिका व तालुका आरोग्य यंत्रणेकडून पथके तयार करून कारवाईचा निव्वळ फार्स केला जात आहे. बहुतांश कोरोनाबाधित कोविड केअर सेंटरमध्ये सुविधा नसल्यामुळे घरीच उपचार घेत आहे. मात्र बहुतांश बाधित रुग्ण अक्षरशः विनामास्क गल्लीबोळात फिरत असल्यामुळे बधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. घरात विलगीकरण झालेल्या रुग्णांकडे कोणतेही पथक फिरत नसल्यामुळे आगामी काळात कोरोनाचा उद्रेक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अंत्ययात्रा तसेच स्मशानभूमीत होणार्या गर्दीकडेदेखील प्रशासन डोळेझाक करत असल्याचे दिसून येत आहे. शहरात तीन मंगलकार्यालय सील करून प्रशासनाने मोठा गाजावाजा केला. तरीदेखील लग्नामधील गर्दी आटोक्यात आणण्यात प्रशासनाला यश आले नाही, तसेच बसस्थानकांवर कोणत्याही प्रकारची काळजी घेतली जात नाही. प्रवाशांच्या गर्दीमुळे आणि बाहेरून येणार्या प्रवाशांची तपासणी होत नसल्यामुळे रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे.
रुग्णांची लूट कधी थांबणार?
कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासनाकडून पुरविल्या जाणार्या सुविधा अपुर्या असल्याने गरीब रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होताना दिसत आहे. गेल्या सात दिवसांत कोरोनाने बळी घेतलेले नऊही रुग्ण आर्थिकदृष्ट्या मागासलेले होते. त्यांना वेळीच उपचार न मिळाल्यानेच ते दगावल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. अपुर्या सुविधांमुळे अनेकांना खासगी हॉस्पिटलमध्ये भरती व्हावे लागत असून, उपचारापूर्वी प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जाते. तसेच दीड लाखाचे पॅकेज असेल तरच भरती व्हा, अन्यथा चालते व्हा अशी दमदाटीची भाषा केली जात असल्याच्या तक्रारी वाढत असून शासनाने संबंधित हॉस्पिटलवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.