गंगापूर व दारणा धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ
By admin | Published: June 29, 2015 01:35 AM2015-06-29T01:35:13+5:302015-06-29T01:35:56+5:30
गंगापूर व दारणा धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ
नाशिक : आर्द्रा नक्षत्राच्या पहिल्याच चरणात पावसाने दमदार हजेरी लावून आता उघडीप घेतली असली तरी नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर व दारणा धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. धरणातील पाणीसाठ्यामुळे नाशिककरांना मोठा दिलासा लाभला असून, सिंहस्थ कुंभमेळ्यात लागणाऱ्या पाणीप्रश्नी चिंता वाहणाऱ्या जिल्हा प्रशासनानेही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. नाशिक शहर व परिसरात आर्द्रा नक्षत्राच्या पहिल्या चरणात पावसाने दमदार हजेरी लावली. त्र्यंबकेश्वर परिसरात पाऊस कमी झाला असला तरी छोट्या नद्या-नाले भरभरून वाहिल्याने गंगापूर धरणात दि. २६ जूनअखेर २३६७ द.ल.घ.फू. म्हणजे ४२ टक्के पाणीसाठा झाला आहे. आठ दिवसांपूर्वी गंगापूर धरणात २५ टके इतका पाणीसाठा होता. गंगापूर धरणात मागील वर्षी दि. २६ जून अखेर २२१९ दलघफू म्हणजे ३९ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. गंगापूर धरणातील पाणीसाठ्याने पहिल्याच पावसात टक्केवारीची चाळीशी ओलांडल्याने नाशिककरांना मोठा दिलासा लाभला आहे. दीड महिन्यांवर सिंहस्थ कुंभमेळा येऊन ठेपला असून, पहिली पर्वणी २९ आॅगस्टला आहे. शासनाने गंगापूर धरणातील काही पाणीसाठा खास सिंहस्थातील तीनही पर्वण्यांसाठी राखीव ठेवला आहे; परंतु आता पावसाने कृपादृष्टी दाखविल्याने पाणीसाठ्यात वाढ होऊन पर्वणीकाळात सहज पाणी उपलब्ध होणार असल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता दूर झाली आहे. दारणा धरण तर निम्मे भरले असून, ३५५२ दलघफू म्हणजे ५० टक्के पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षी दारणा धरणात २६ जूनअखेर अवघा ४७७ दलघफू म्हणजे ७ टक्के पाणीसाठा होता. दारणाचे पाणी जायकवाडीसाठी सोडण्यात आल्याने सदर पाणीसाठा कमी झाला होता. आता दारणातही पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. याशिवाय कश्यपी धरणात यंदा ४०७ दलघफू म्हणजे २२ टक्के पाणीसाठा झाला आहे तर गौतमी गोदावरी धरणातही १४५ दलघफू म्हणजे ८ टक्के इतका पाणीसाठा आहे. (प्रतिनिधी)