विंचूर ग्रामपालिकेत पॅनलनिर्मितीचे संकेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2020 03:48 PM2020-12-20T15:48:13+5:302020-12-20T15:48:51+5:30

विंचूर : ग्रामपालिका निवडणुकीची तारीख जशी जवळ येऊ लागली आहे तसे येथील वातावरण तापू लागले आहे. यंदाच्या निवडणुकीत कोणती रणनीती आखायची यासाठी सार्वजनिक बैठकांसह गुप्त बैठकांचा जोर वाढू लागला आहे. कोणाची काय रणनीती असणार याचा कानोसा इच्छुकांकडून घेतला जात आहे. गटातटावर अवलंबून असणाऱ्या या निवडणुकीत यंदा मात्र पॅनलनिर्मितीचे संकेत मिळत आहेत.

Signs of panel formation in Vinchur village municipality! | विंचूर ग्रामपालिकेत पॅनलनिर्मितीचे संकेत!

विंचूर ग्रामपालिकेत पॅनलनिर्मितीचे संकेत!

googlenewsNext
ठळक मुद्देनिवडणुकीचे वातावरण तापले : गुप्त बैठकांना जोर

निफाड तालुक्यातील महत्त्वाच्या आणि मोठ्या ग्रामपालिकांपैकी विंचूर हे एक गाव मानले जाते; परंतु गेल्या अनेक पंचवार्षिक निवडणुकीत एकहाती नेतृत्व विंचूरला लाभले नाही. पूर्वीच्या काळी भास्करराव दरेकर पाटील यांच्या रूपाने एक नेतृत्व होते, तर त्यांच्या विरोधात लक्ष्मणराव माधवराव गुंजाळ यांचे नेतृत्व होते. या दोघांनाही काका नावाने लोक संबोधित. अनेक वर्षे दोन्ही काका एकमेकांच्या विरोधात पॅनल तयार करून निवडणुका लढावायचे. मात्र नंतरच्या काळात नाशिक जिल्ह्यात विंचूर असे गाव राहिले, की येथे कोणाचे पॅनल निर्मित होऊन एक हाती नेतृत्व तयार झाले नाही.
यंदाच्या निवडणुकीत मात्र पॅनलनिर्मिती करून निवडणूक लढवावी या उद्देशाने येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये सर्वपक्षीय, सर्व जातीय, धर्माचे, सर्व पक्षांचे सामुदायिक नेतृत्व पुढे येऊन गावासाठी चांगला सक्षम पर्याय देण्याबाबत विचार-विनिमय करण्यात आला. यापूर्वीच्या निवडणुका प्रत्येक वॉर्डमध्ये आपापले नेतृत्व प्रस्थापित करून निवडणुका व्हायच्या व नंतर सरपंचपदासाठी रस्सीखेच, वेगवेगळ्या गोष्टींचा, जातीचा उपयोग करून सत्ता स्थापन झाल्या. सरपंच व उपसरपंचपदासाठी मोठ्या प्रमाणात निवडणुका झाल्या. यात वेळ, पैसा खर्च झाला. अनेक मोठ्या गावांमध्ये पॅनलनिर्मिती करून निवडणुका लढविल्या जातात, तशा विंचूरलाही व्हाव्यात अशी अनेकांची इच्छा होती. निवडणुकीत सामुदायिक नेतृत्वाने गावाला १७ लोकांचे पॅनल देऊन योग्य पर्याय देण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. त्या माध्यमातून गावातील विविध पक्षांतील,सर्व जातीधर्माचे लोक एकत्र आले. ज्येष्ठ नागरिक भवनात झालेल्या बैठकीस प्रत्येकाने आपली भूमिका मांडली. उपस्थितांनी त्यास अनुमती दिली. या बैठकीत ॲड. संजय दरेकर, किशोर पाटील, संजय शेवाळे, कैलास सोनवणे, राजाराम दरेकर, अशोक दरेकर, सचिन दरेकर, अनिल मालपाणी, ॲड. जयंत शिरसाठ, आत्माराम दरेकर, किशोर जेऊघाले, आस्लम शेख, बाळासाहेब नेवगे, योगेश निकाळे, संदीप दरेकर यांनी विचार मांडले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुढील बैठक सावता महाराज मंदिरात बोलाविण्यात येऊन बैठकींंचे सत्र सुरू झाले. या बैठकीत कॉमन मिनिमम प्रोग्रॅमवर चर्चा झाली. गावाच्या विकासासाठी सर्वांना सामावून पॅनलनिर्मितीचा प्रस्ताव तयार करण्यात आला. यासाठी ग्रामसमिती स्थापन करण्याचे ठरविण्यात आले. दरम्यान, सोशल मीडियावर या ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण तापल्याचे चित्र आहे. ग्रामपालिका सदस्य कसा असावा, सरपंच कसा असावा, यासाठीचे संदेश, विनोद, मिम्स व्हायरल होऊ लागले आहेत. ग्रामीण भागातील ग्रामपंचायत निवडणूक, सरपंच यांच्याबाबत यापूर्वी विनोदातून मांडलेले भास्करराव पेरे पाटील आणि इंदोरीकर महाराज यांचे व्हिडिओ शेअर केले जात आहेत.

Web Title: Signs of panel formation in Vinchur village municipality!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.