पुनंदचे पाणी पेटण्याची चिन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 05:30 PM2019-02-06T17:30:42+5:302019-02-06T17:31:01+5:30
मोकभणगीत बैठक : शेतकऱ्यांचा आंदोलनाचा निर्धार
कळवण : तालुक्यातील जलाशयात असलेल्या पाण्यावर प्रथम हक्क तालुक्यातील जनतेचा असल्याने अर्जुनसागर(पुनंद) प्रकल्पातून सटाणा शहरापर्यत जलवाहिनी टाकण्यास तिव्र विरोध दर्शवत कळवण तालुक्यातून जलवाहिनी जाऊ देणार नाही, यासाठी जनआंदोलन करण्याचा निर्धार मोकभणगी येथे बुधवारी (दि.६) झालेल्या बैठकीत शेतक-यांनी केला.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पाशवभूमीवर सटाणा नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येत्या ९ फेब्रुवारी रोजी होत असल्याने कळवण तालुक्यात त्याचे पडसाद उमटत आहेत. मोकभणगी येथे आयोजित लाभक्षेत्रातील शेतकरी, ग्रामस्थ व तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी,कार्यकर्ते यांच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार,बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, जिल्हा परिषदेचे माजी सभापती रविंद्र देवरे, पंचायत समितीचे सभापती केदा ठाकरे, शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख कारभारी आहेर, कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र हिरे,शिवसेनेचे तालुकाप्रमुख अंबादास जाधव,मनसेचे तालुकाध्यक्ष शशी पाटील, बाजार समितीचे संचालक शितलकुमार अहिरे, मोहन जाधव, शांताराम जाधव , रायुकॉचे तालुका कार्याध्यक्ष संदीप वाघ यांनी विरोध दर्शवत कळवण तालुक्यातील शेतकरी बांधवांना बरोबर घेऊन जनआंदोलन करण्याचा इशारा दिल्याने कळवण तालुका विरु ध्द सटाणा नगरपालिका असा संघर्ष आता पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. दरम्यान सटाणा नगरपालिकेच्या पाणी पुरवठा योजनेच्या विरोधात ८ फेब्रुवारी रोजी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत कार्यालयाला घेराव व कोल्हापूर फाटा येथे रस्ता रोको आंदोलन तर ९ फेब्रुवारी रोजी अर्जुनसागर(पुनंद)प्रकल्पावर जलसमाधी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, बाजार समितीचे सभापती धनंजय पवार यांनी यावेळी दिली.
जलवाहिनीला विरोध
मोकभणगी येथे अर्जुनसागर(पुनंद)प्रकल्प लाभक्षेत्रातील 40 गाव वाड्या वस्तीवरील प्रमुख पदाधिकारी व शेतकरी बांधवांची बैठक शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देवीदास पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनीअर्जुनसागर(पुनंद) मधून जलवाहीनीद्वारे पाणी पुरवठा योजना राबविल्यास मोठे संकट उभे राहणार असल्याचे सांगत हा जीवनमरणाचा प्रश्न असल्याचे स्पष्ट केले. रवींद्र देवरे यांनी चणकापूरमधून मालेगावसाठी पाणी आरक्षणात सातत्याने वाढ झाल्याने शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी बांधवांना आज पाणी मिळत नसल्याचे सांगितले. बैठकीचे अध्यक्ष शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देवीदास पवार यांनी कळवण तालुक्यातून पाणी बाहेर पडू देणार नसल्याचे स्पष्ट केले. बैठकीस लाभक्षेत्रातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.