शिवसेनेच्या बंडाविषयी मौन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 01:42 AM2019-10-18T01:42:22+5:302019-10-18T01:43:35+5:30
दोन वर्षांपूर्वी झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत नाशिकला दत्तक घेण्याच्या घोषणेनंतर ‘अच्छे दिन’सारखा हा प्रश्न भाजपची डोकेदुखी ठरला होता. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत विरोधकांच्या हाच प्रचाराचा कळीचा मुद्दा ठरला असताना अखेरच्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि.१७) झालेल्या जाहीरसभेत नवीन गुंतवणूक, एचएचएलच्या प्रश्न असे अनेक विषय हाताळून विरोधकांची तोंडे गप्प करण्याचा प्रयत्न केला. मात्र याच सभेवरदेखील शिवसेनेचा बहिष्कार असल्याने युतीत जो वाद निर्माण झाला आहे. त्यावर फडणवीस यांनी मात्र सोयीस्कररीत्या मौन पाळले.
नाशिक : दोन वर्षांपूर्वी झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत नाशिकला दत्तक घेण्याच्या घोषणेनंतर ‘अच्छे दिन’सारखा हा प्रश्न भाजपची डोकेदुखी ठरला होता. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत विरोधकांच्या हाच प्रचाराचा कळीचा मुद्दा ठरला असताना अखेरच्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि.१७) झालेल्या जाहीरसभेत नवीन गुंतवणूक, एचएचएलच्या प्रश्न असे अनेक विषय हाताळून विरोधकांची तोंडे गप्प करण्याचा प्रयत्न केला. मात्र याच सभेवरदेखील शिवसेनेचा बहिष्कार असल्याने युतीत जो वाद निर्माण झाला आहे. त्यावर फडणवीस यांनी मात्र सोयीस्कररीत्या मौन पाळले.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा ज्वर वाढू लागला असून टीकाटिप्पणी आणि आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दत्तक पित्याची भूमिका निभावली नसल्याचा आरोप होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर दत्तक पिता सापत्नपणाची वागणूक देत असल्याचा आरोप विरोधक करीत आहेत.
गुरुवारी पंचवटीत गोदाकाठी झालेल्या सभेत फडणवीस यांनी त्याच मुद्द्यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. स्मार्ट सिटी, सार्वजनिक वाहतूक, हायब्रीट मेट्रो अशा अनेक कामांना त्यांनी उजाळा दिला. अर्थात, असे करताना त्यांनी अनेक अडचणींच्या विषयांना हात घातला नाही. नाशिककरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या पार्किंगचा प्रश्न, बेकायदा धार्मिक स्थळांचा प्रश्न, महापालिकेच्या मिळकतीतील उपक्रमांवर आलेले गंडांतर याला त्यांनी स्पर्श केला नाही.
निवडणुकीतील जटिल प्रश्न युतीचा होता. शिवसेना भाजप उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय नाही. पदाधिकारी आणि नगरसेवकांनी राजीनामे देऊन पश्चिममध्ये पुरस्कृत उमेदवारालाच पाठबळ आहे. परंतु युतीमधील विसंवादावर बोलणे फडणवीस यांनी टाळले.
अखेर घोलप आले, पण सोयीसाठी !
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होत असतानादेखील शिवसेनेचा बहिष्कार कायम होता. रिपाइं, रासपसह अन्य पक्षांचे पदाधिकारी उपस्थित असताना शिवसेनेचे कोणीच उपस्थित नव्हते. मुख्यमंत्र्यांचे भाषण संपल्यानंतर शिवसेनेचे नेते आणि माजी समाजकल्याण मंत्री बबनराव घोलप यांचे आगमन झाले. अर्थात, नाशिक तालुक्यातील सिद्धप्रिंप्री येथील मतांच्या ओढीने ते व्यासपीठावर आले, अशी चर्चा होती.