त्र्यंबकेश्वरच्या निरंजनी पंचायत आखाड्यात सन्नाटा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:17 AM2021-09-22T04:17:58+5:302021-09-22T04:17:58+5:30

वसंत तिवडे त्र्यंबकेश्वर : अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी महाराज यांच्या निधनानंतर येथील निरंजन पंचायत आखाड्याच्या विशाल ...

Silence in Trimbakeshwar's Niranjani Panchayat arena! | त्र्यंबकेश्वरच्या निरंजनी पंचायत आखाड्यात सन्नाटा !

त्र्यंबकेश्वरच्या निरंजनी पंचायत आखाड्यात सन्नाटा !

Next

वसंत तिवडे

त्र्यंबकेश्वर : अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी महाराज यांच्या निधनानंतर येथील निरंजन पंचायत आखाड्याच्या विशाल परिसरात स्मशानशांतता पसरली होती. सर्वत्र सन्नाटा पसरला होता. एरवी साधू-महंतांच्या, माणसांच्या कोलाहलाने गजबजलेला या परिसरात आता मात्र कोणीच नव्हते.

ब्रह्मलीन श्रीमहंत नरेंद्रगिरी महाराज हे श्रीपंचायती निरंजनी आखाड्याचे संरक्षक महंत तथा अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष होते. त्यांच्या निधनाने आखाडा परिषदेचेच नव्हे तर साधू, संत, महंतांचे तसेच त्यांच्या असंख्य अनुयायांचेसुद्धा मोठे नुकसान झाले आहे.

प्रयाग येथे सोमवारी (दि. २०) महंत नरेंद्रगिरींचा संशयास्पद मृत्यू झाला. श्री निरंजनी पंचायत आखाड्याचे अध्यक्ष म्हणून त्र्यंबकेश्वर येथील २०१५-१६ च्या सिंहस्थ कुंभमेळ्यात त्यांची निवड करण्यात आली होती. या निवडीनंतर त्र्यंबकेश्वर नगरीत जल्लोषात मिरवणूकदेखील काढण्यात आली होती. भाविक, मान्यवर तसेच नागरिकांच्या सतत संपर्कात असलेल्या महंत नरेंद्रगिरी महाराजांच्या आकस्मिक जाण्याने त्र्यंबकेश्वर येथील निरंजनी पंचायत आखाड्यावर उदासीनता दाटून आलेली दिसत आहे. तेथे त्यांचे मोजकेच अनुयायी होते. दरम्यान, नरेंद्रगिरी महाराजांच्या अंत्यसंस्कार विधीकरिता त्र्यंबकेश्वरच्या आखाड्यातून कोणीही प्रयाग येथे गेले नसल्याचे सांगण्यात आले; मात्र येथे मोजक्याच असलेल्या लोकांपैकी कोणीही बोलण्याच्या मन:स्थितीत नव्हते.

आखाड्यात प्रवेश केल्यावर तेथील मुक्कामी महंत धनंजय गिरी महाराज बिछान्यावर पडून शून्यात पाहत होते. एवढ्या अवाढव्य आखाड्यात ते एकटेच राहत होते.

चौकट...

भारतातील अनेक तीर्थक्षेत्री आखाड्यांच्या वास्तू आहेत, तशाच त्र्यंबकेश्वर या तीर्थक्षेत्री व जवळच्या अंबोली येथील बुवाचीवाडी येथे आखाड्याची मालमत्ता आहे. संपूर्ण बुवाची वाडी निरंजनी आखाड्याची प्राॅपर्टी आहे. येथे आखाड्याच्या मालकीचा सीएनजी प्रकल्पदेखील लवकरच साकारला जात आहे.

चौकट...

सिंहस्थ पर्वकाळात शाही स्नानास तपोनिधी श्रीपंचायती आखाडा निरंजनी व तपोनिधी श्रीपंचायती आनंद आखाडा हे बरोबर शाही स्नानास जातात. हे दोन्ही आखाडे एकमेकांचे भाऊ असल्याने एकत्र शाही स्नानास जातात; मात्र आनंद आखाड्याची इष्टदेवता सूर्य आहे. दरम्यान, आपल्या खासगी कामासाठी आनंद आखाड्याचे महंत तथा अखिल भारतीय आखाडा परिषदेचे कोषाध्यक्ष श्रीमंत शंकरानंद सरस्वती हे प्रयागराज येथे जाण्यासाठी निघाले असताना रस्त्यात ट्रॅफिक जाममुळे ते विमानतळावर उशिरा पोहोचल्याने त्यांचे विमान चुकले. ते परत निघाले असताना त्यांना नरेंद्रगिरींच्या समाधी सोहळ्याचा कार्यक्रम गुरुवारी असल्याचे समजले. म्हणून ते मुंबईवरूनच बुधवारी विमानाने प्रयागराजला पोहोचतील व गुरुवारी समाधी सोहळ्यात सहभागी होणार आहेत. त्यामुळे त्र्यंबकेश्वर येथून फक्त आनंद आखाड्याचे महंत शंकरानंद सरस्वती व आनंद आखाड्याचे पंच परमेश्वर महंत गिरिजानंद सरस्वती समाधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत, असे सांगण्यात आले.

कोट...

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी महाराज यांच्या सहवासात मी असल्याने त्यांनी आखाडा परिषओसंदर्भात घेतलेले निर्णय मी अनुभवले आहेत. त्यांच्या अचानक जाण्याने आखाडा परिषदेची न भरून येणारी हानी झाली आहे. त्यांच्या मृत्यूची चौकशी करावी.

- स्वामी सागरानंद सरस्वती, अध्यक्ष, षड्दर्शन आखाडा परिषद, त्र्यंबकेश्वर

Web Title: Silence in Trimbakeshwar's Niranjani Panchayat arena!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.