कृषिमंत्र्यांचे मौनव्रत आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 10:21 PM2020-05-09T22:21:11+5:302020-05-10T00:47:53+5:30
मालेगाव: स्थानिक व जिल्हा प्रशासनाला कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात व वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यात अपयश आले आहे. वारंवार सूचना देऊनही प्रशासनाला गांभीर्य उरले नसल्याची भावना व्यक्त करत संतप्त झालेले राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळील हनुमान व गणपती मंदिरात बसून मौनव्रत धारण करत निषेध नोंदविला. यावेळी त्यांनी शहर व तालुक्यावरील कोरोनाचे संकट दूर करण्याचेही साकडे हनुमानाला घातले.

दादा भुसे यांनी जिल्हाधिकारी सुरज मांढरे व आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून मालेगावच्या परिस्थितीबाबत जाणीव करून देत ‘मालेगावच्या शेवटच्या नागरिकाच्या अंत्यविधीलाच या’ अशा शब्दात खडसावले. मालेगावी कोरोनाबधितांची संख्या पाचशेच्या उंबरठ्यावर पोचली आहे. तरीदेखील स्थानिक व जिल्हा स्तरीय यंत्रणेकडून कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी पावले उचलली जात नाहीत. यामुळे संतप्त झालेल्या भुसे यांनी शनिवारी (दि.९) त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळील हनुमान मंदिरात मौनव्रत धारण केले होते. सदर आंदोलन पाच तास सुरू होते. यावेळी त्यांच्या समवेत सुनील देवरे, संजय दुसाने भरत देवरे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्यानंतर भुसे यांनी मौनव्रत सोडले. दरम्यान नाशिक व धुळ्याच्या लोकप्रतिनिधींनी कोरोना बाधित रुग्ण इकडे आणू नये अशी भूमिका घेतल्यामुळे मालेगावला वाळीत टाकल्याची भावना निर्माण झाली आहे.
----------
अधिकाºयांकडून मिनतवाºया
कृषिमंत्र्यांनी पुकारलेल्या या आंदोलनाची माहिती माजी आमदार रशीद शेख, महापौर ताहेरा शेख यांना मिळाल्यानंतर त्यांनी धाव घेऊन भुसे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, प्रांताधिकारी विजयानंद शर्मा ,तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांनीही मंदिराकडे धाव घेतली मात्र त्यांची मध्यस्थी निष्फळ ठरली. यावेळी आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी सैंदाणे यांना देखील भुसे यांनी फैलावर घेतले.