कलबुर्गी यांच्या हत्त्येच्या निषेधार्थ मूक निदर्शने
By admin | Published: September 9, 2015 11:50 PM2015-09-09T23:50:40+5:302015-09-09T23:51:06+5:30
कलबुर्गी यांच्या हत्त्येच्या निषेधार्थ मूक निदर्शने
नाशिक : प्रसिद्ध विचारवंत, साहित्यिक आणि कर्नाटक विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एच. एम. कलबुर्गी यांच्या हत्त्येच्या तपासाबाबत शासन उदासीनता दर्शवित असून, त्याच्या हत्त्येच्या निषेधार्थ डावे पक्ष आणि पुरोगामी संघटनांच्या वतीने डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ मूक निदर्शने करण्यात आली.
कलबुर्गी यांनी समाजातील अंधश्रध्दा आणि दांभिकता या विषयावर प्रकाशझोत टाकला होता. अंधश्रध्देच्या बंधनातून समाज मुक्त व्हावा, यासाठी ते प्रयत्न करीत होते. अंधश्रध्दा, धर्मांधता आणि दांभिकता जोपासण्यात ज्यांचे हितसंबंध आहेत, अशा धर्माच्या स्वयंघोषित ठेकेदारांनी त्यांची हत्त्या केली, असा आरोप या संघटनांनी केला. अशीच हत्त्या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि शिवाजी महाराजांचे कर्तृत्व खऱ्या स्वरूपात समाजासमोर आणणारे गोविंद पानसरे यांची करण्यात आली.
यावेळी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मूक निदर्शने करण्यात आली. आंदोलनात वसंत हुदलीकर, राजू देसले, डॉ. डी. एल. कराड, अॅड. मनीष बस्ते, महेंद्र दातरंगे, केरू पाटील हगवणे, अॅड. तानाजी जायभावे, दत्तू तुपे, निशिकांत पगारे, दीप्ती राऊत, मुकुंद दीक्षित, सचिन मालेगावकर, अॅड. जे. टी. शिंदे, पी. बी. गायधनी आदि सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनदाभोलकर, पानसरे व कलबुर्गी या तिघांची हत्त्या करणारे सूत्र एकच असून, समाजातील विवेक व समतेचा पुरस्कार दडपून टाकायचा हा त्या मागील हेतू आहे. सरकार या घटनांमधील गुन्हेगारांना पकडण्याबाबत उदासीन आहे, असा आरोप करणारे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.