नराधमांना अटक करा, राष्ट्रपती राजवट लागू करा; मणिपूर घटनेच्या निषेधार्थ मूकमोर्चा
By संजय दुनबळे | Published: July 26, 2023 05:23 PM2023-07-26T17:23:06+5:302023-07-26T17:31:33+5:30
शिवाजी रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळून मोर्चास सुरुवात झाली.
नाशिक : आम्हाला मणिपूरमध्ये शांतता हवी आहे, नराधमांना अटक करा, मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा, मणिपूरमध्ये शाळांवर होणारे हल्ले थांबवा, अशा विविध घोषणांचे फलक हातात घेऊन शेकडो नागरिकांनी भरपावसात मूकमोर्चा काढून मणिपूरच्या घटनेचा निषेध नोंदविला. गेल्या ७० दिवसांपासून मणिपूरचा प्रश्न धुमसत असून दोन महिलांची नग्न धिंड काढण्याचा प्रकारही या ठिकाणी घडला आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही भारताचे लोक या संस्थेच्यावतीने मंगळवारी (२५) सायंकाळी मूकमाेर्चाचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर पाऊस सुरू असला तरी त्याची फिकीर न करता अनेक नागरिक रेनकोट घालून तर काही छत्र्या घेऊन मोर्चात सहभागी झाले होते.
शिवाजी रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळून मोर्चास सुरुवात झाली. नेहरू गार्डन, मेहेर चौक मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचला. मोर्चात विविध महिला संघटनांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्या आणि पुरोगामी चळवळीतील विविध पक्ष आणि संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची उपस्थिती असली तरी मोर्चात कोणत्याही घोषणा देण्यात आल्या नाहीत. मोर्चेकरांच्या हातात असलेले विविध मागण्यांचे फलक येणाऱ्या जाणारांचे लक्ष वेधून घेत होते. मार्चाच्यावतीने भारताच्या राष्ट्रपती आणि मणिपूरचे राज्यपाल यांच्या नावाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. विविध पदाधिकऱ्यांनी मेार्चाचे नेतृत्व केले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.
निवेदनात करण्यात आलेल्या मागण्या
मणिपूरचे राज्य सरकार त्वरित बरखास्त करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करावी. मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न असफल झाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत निवेदन करावे व गृहमंत्री अमित शहा यांचे पद काढून घेऊन त्यांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी. येथील घटनेची त्वरित चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, आदी विविध मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.