स्वच्छतागृहातून शिक्षिकेचा व्हिडिओ करणाऱ्यास बेदम चोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 01:06 AM2019-08-31T01:06:52+5:302019-08-31T01:07:28+5:30
शहरातील एका महाविद्यालयात पुरुष स्वच्छतागृहात लपून महिला स्वच्छतागृहातील शिक्षिकेचा अश्लील व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेनंतर महाविद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षकांनी संशयित आरोपीला बेदम चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले असून, याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक : शहरातील एका महाविद्यालयात पुरुष स्वच्छतागृहात लपून महिला स्वच्छतागृहातील शिक्षिकेचा अश्लील व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेनंतर महाविद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षकांनी संशयित आरोपीला बेदम चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले असून, याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगापूरोडवरील व्ही.एन. नाईक शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात हा प्रकार घडला. संशयित आरोपी अनिल पवार (२५) हा महाविद्यालयातील कंत्राटी सुरक्षारक्षक असून, तो पुरुष स्वच्छतागृहाच्या भिंतीवर चढून महिलांच्या स्वच्छतागृहातील शिक्षिकेचे मोबाइलच्या साह्याने अश्लील चित्रीकरण करीत होता. महाविद्यालयात महिला व पुरुषांसाठी असलेल्या स्वच्छतागृहाचे भिंत टाकून विभाजन करण्यात आले आहे. या भिंतीवर पाण्याची टाकी ठेवण्यात आलेली असून, या पाण्याच्या टाकीजवळ बसून संशयित चित्रीकरण करीत असताना त्याचा मोबाइल व्हायब्रेट झाल्याने महिलेला संशय आला. तिने वर पाहिले असता संशयिताचा हात आणि मोबाइल दिसल्यामुळे शिक्षिकेने आरडाओरडा करीत बाहेर पळ काढला. त्यामुळे महाविद्यालयाच्या आवारातील विद्यार्थी आणि शिक्षक काही क्षणांत घटनास्थळाजवळ जमले. याचवेळी चित्रीकरण करणारा कंत्राटी सुरक्षारक्षकही आपल्या बचावासाठी पळ काढण्याच्या प्रयत्नात असताना विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी त्याला पकडून बेदम चोप दिला. त्यानंतर महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात संशयिताविरोधात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात घडलेल्या प्रकाराबाबत महाविद्यालय प्रशासनाने प्रसिद्धीपत्रक काढून खुलासा केला आहे. त्यानुसार संस्थेने सुरक्षेचे कंत्राट अलर्ट सिक्युरिटी फोर्स या एजन्सीला दिले असून, या एजन्सीचा एक सुरक्षारक्षक महिला स्वच्छतागृहात आढळून आला. महाविद्यालयतील काही महिला कर्मचाऱ्यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर तातडीने सुरक्षारक्षकाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. बडगुजर यांनी तत्काळ संस्थेच्या पदाधिकाºयांनाही या प्रकाराबाबत अवगत केले. सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्यादही दिली असून, त्यात सुरक्षारक्षक हा संस्थेचा कर्मचारी नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.