अठराव्या शतकातील चांदीची नाणी सापडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 01:02 AM2018-12-29T01:02:21+5:302018-12-29T01:02:56+5:30
भगूर रेल्वे लाइनजवळील जुने घर पाडण्यासाठी खोदत असताना १८व्या शतकातील प्राचीन चांदीच्या धातूची ४६ नाणी सापडल्याची घटना भगूर रेल्वे लाइनजवळ घडली आहे़
नाशिकरोड : भगूर रेल्वे लाइनजवळील जुने घर पाडण्यासाठी खोदत असताना १८व्या शतकातील प्राचीन चांदीच्या धातूची ४६ नाणी सापडल्याची घटना भगूर रेल्वे लाइनजवळ घडली आहे़ विशेष म्हणजे मजुरांमध्ये नाणी वाटपावरून वाद झाला व तो पोलीस ठाण्यात पोहोचल्याने हा प्रकार उघडकीस आला़ दरम्यान, ही नाणी नाशिकरोड पोलिसांनी जमा केली आहे़ भगूर गावातील रेल्वे लाइनजवळील जुने घर पाडण्यासाठी विहितगाव, बागुलनगरमधील चार-पाच मजूर गेले होते़ घर पाडत असताना एका ठिकाणी खड्डा करताना मजुरांना गुरुवारी (दि़२७) चांदीची ४६ पुरातन नाणी सापडली़ या सापडलेल्या नाण्यांच्या वाटपावरून मजुरांमध्ये रात्री वाद झाले व नाशिकरोड पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले़ वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांनी या मजुरांना बोलावून घेतल्यानंतर भगूरमधील घर पाडताना खोदकाम करताना नाणी सापडल्याचे समोर आले़
नाशिकरोड पोलिसांनी १८व्या शतकातील ४६ चांदीची नाणी जप्त केली असून, या मजुरांना भगूरमध्ये कोणाच्या घर पाडण्याचे काम मिळाले तेदेखील सांगता येत नसल्याचे ढोकणे यांनी सांगितले़ दरम्यान, संबंधित मजुरांकडून या घराची माहिती घेतल्यास तसेच या ठिकाणी खोदकाम केल्यास आणखी काही नाणी सापडण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, याकडे पुरातत्व विभागाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे़