सिंहस्थ कुंभातून भाविकांना घडले धर्मसंस्कृतीचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2015 11:28 PM2015-09-20T23:28:17+5:302015-09-20T23:30:11+5:30
महंत आनंदगिरी महाराज : योग शिबिराची सांगता
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यातून भाविकांना आपल्या प्राचीन भारतीय हिंदू धर्म संस्कृतीचे उज्ज्वल दर्शन घडले. तर साधू-महंतांची त्यागी जीवनपद्धती जाणून घेता आली, त्यातूनच धर्म व साधू-संतांप्रती आस्था वाढली, असे विचार महंत आनंदगिरी महाराज यांनी केले.
सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त चोपडा लॉन्स येथे गेल्या महिनाभरापासून विविध धार्मिक कार्यक्रमांसह योग शिबिर सुरू होते. त्याच्या सांगतानिमित्त साधू-महंतांच्या उपस्थितीत भंडारा कार्यक्रमात महाराज बोलत होते. याप्रसंगी आनंदगिरी महाराज म्हणाले की, केवळ साधू-महंत दिसले की, सर्वसामान्य माणूस त्यांच्यापुढे नतमस्तक होतो. तपस्वी व थोरामोठ्यांचा आदरभाव ही आपली संस्कृतीच आहे. परंतु त्यांच्या तप, जप आणि ज्ञानाबद्दलदेखील आपण जाणून घेतले पाहिजे. त्यातूनच आपल्याला धर्माविषयी अधिक माहिती मिळून ज्ञान प्राप्त होऊ शकते. सिंहस्थामुळे ही गोष्ट शक्य झाली, असेही महाराज म्हणाले. याप्रसंगी निरंजनी आखाड्याचे अनेक साधू-महंत यांनीदेखील उपस्थित भाविकांच्या धर्मविषयक शंकांचे निरसन केले. भंडाऱ्याचा कार्यक्रम झाला. (प्रतिनिधी)