सिंहस्थ कुंभमेळ्याचे होणार ‘ई-रेकॉर्ड’
By admin | Published: September 2, 2016 01:19 AM2016-09-02T01:19:25+5:302016-09-02T01:19:38+5:30
दस्तावेजीकरण : विभागीय आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यातील पर्वणी काळातील प्रत्येक घटना-घडामोडींचे ‘ई-रेकॉर्ड’ तयार करण्याच्या सूचना राज्याचे मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय यांनी दिले आहेत. सर्व विभागांशी समन्वय राखून सिंहस्थाचे दस्तावेजीकरणाची जबाबदारी विभागीय आयुक्तांकडे सोपविण्यात आली आहे. या ‘ई-रेकॉर्ड’चा लाभ पुढील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी होणार आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याची यशस्वी सांगता झाल्यानंतर त्याबाबतचा आढावा घेणारी बैठक मुंबईत राज्याचे मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय यांच्याकडे बुधवारी झाली. यावेळी नाशिक महापालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्ण आणि सिंहस्थ समन्वयक कक्षाचे महेश तिवारी उपस्थित होते. यावेळी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या यशस्वीतेबद्दल प्रशंसा करण्यात आली. सिंहस्थ कुंभमेळ्यात कोणतीही अनुचित घटना घडली नाही. पर्वणी काळातील सर्व घटना-घडामोडी, वेगवेगळ्या यंत्रणेने केलेले नियोजन व त्यानुसार झालेली अंमलबजावणी याबाबतची माहिती संकलित करून त्याचे ‘ई-रेकॉर्ड’ तयार करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.