सिंहस्थ कामांचे सर्वेक्षण सापडणार वादात
By admin | Published: October 30, 2016 02:01 AM2016-10-30T02:01:27+5:302016-10-30T02:04:41+5:30
आक्षेप : उधळपट्टीवर लाखो रुपये अदा
नाशिक : नाशिक, त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यात सिंहस्थ निधी अंतर्गत करण्यात आलेल्या जिल्हा परिषदेच्या रस्त्यांचे सर्वेक्षण आणि त्यापोटी खर्च करण्यात आलेल्या लाखो रुपयांच्या उधळपट्टीवर लेखा परीक्षणात आक्षेप आल्याचे वृत्त आहे.
सिंहस्थात नाशिक शहरात व ग्रामीण भागात कोट्यवधी रुपयांची विकासकामे करण्यात आली. नाशिक जिल्हा परिषदेमार्फतही अनेक कामे करण्यात आली. नाशिक तालुक्यात सिंहस्थ विशेष निधी अंतर्गत १० ते १२ रस्त्यांची कोट्यवधी रुपयांची कामे करण्यात आली. या कामांच्या सर्वेक्षणापोटी तब्बल जवळपास १३ लाख रुपये खर्च करण्यात आल्याचे समजते. सिंहस्थांत करण्यात आलेल्या कामांच्या पाहणी, तपासणी व सर्वेक्षणाबाबत असे १३ लाख रुपये केवळ सर्वेक्षणावर खर्च करण्यात आल्याने, इतका लाखोंचा निधी अशाप्रकारे सर्वेक्षणावर खर्च करण्यावर लेखा परीक्षणात आक्षेप नोेंदविण्यात आल्याचे समजते. (प्रतिनिधी)
१३ लाखांंची रक्कम काढण्यात आल्याचा आरोप
इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातही सिंहस्थात रस्ते तसेच अन्य बांधकामेही करण्यात आली. त्यांच्याही सर्वेक्षणावर अशीच लाखोंची उधळपट्टी करण्यात आल्याची शक्यता आहे. यासंदर्भात उपसभापती अनिल ढिकले यांनी पंचायत समिती स्तरावर माहिती मागविली असता त्यांना उपअभियंता व शाखा अभियंता यांनी ही माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य बांधकाम विभागाकडे असल्याचे सांगितले. निधी जिल्हा परिषदेकडे आला व नंतर तो पंचायत समितीकडे वर्ग करण्यात आल्याने त्याची माहिती जिल्हा परिषदेकडेच असल्याचे सांगत या अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप अनिल ढिकले यांनी केला आहे. केवळ कागदोपत्री सर्वेक्षण दाखवून ही १३ लाखांंची रक्कम काढण्यात आल्याचा आरोपही उपसभापती अनिल ढिकले यांनी केला आहे.