"मी माय झाले, पण..."; नाशिककरांनाही सिंधूताईंनी घातली होती मदतीची हाक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 12:55 PM2022-01-05T12:55:16+5:302022-01-05T12:59:37+5:30
सिंधूताई सपकाळ यांचे मंगळवारी (दि. ४) रात्री पुण्यात निधन झाले. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या आणि अन्य नागरिकांनीही शाेक संवेदना ...
सिंधूताई सपकाळ यांचे मंगळवारी (दि. ४) रात्री पुण्यात निधन झाले. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या आणि अन्य नागरिकांनीही शाेक संवेदना व्यक्त केल्या, तसेच अनेकांनी आठवणींना उजाळा दिला. नाशिकमध्ये अनेक सामाजिक कार्यक्रमांना हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी केलेल्या भाषणातील मुद्यांच्या अनेकांनी आठवणी जागवल्या.
नाशिकच्या पसा नाट्यगृहात झालेल्या सत्कार सोहळ्याप्रसंगी काढलेल्या भावनाविवश उद्गारांनी नाशिककरदेखील हेलावले होते. मी अनाथांची माय झाले तरी त्यांच्या सर्व गरजा पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे तुमच्यातील प्रत्येक दानशूराने पुढे होऊन समाजातील या दुर्लक्षित घटकासाठी उदारपणा दाखविण्याचे आवाहन केले होते. मला माय बनता आलं म्हणून मी माय झाले, पण कोणत्याही लेकरांना आर्थिक पाठबळ देणारा बापदेखील हवा असतो ते कर्तव्य तुम्ही पार पाडा, असे आवाहन सिंधूताई यांनी केले होते. त्याशिवाय सिंधूताईंचा सत्कार सिडको परिसरातदेखील करण्यात आला होता. कोणत्याही कार्यक्रमाला आल्या तरी ‘घार हिंडते आकाशी, तिचे चित्त पिलापाशी’ या उक्तीप्रमाणे त्यांच्या सत्कार सोहळ्यातही त्यांना पाठीमागे असलेल्या अनाथ बालकांचा विसर पडत नसे.