गायक शिंदे पिता-पुत्र येणार ‘आमने-सामने’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 01:51 AM2018-02-25T01:51:48+5:302018-02-25T01:51:48+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘शिका, संघटित व्हा व संघर्ष करा’ असा संदेश आपल्या अनुयायांना दिलेला असताना नाशकात मात्र त्यांच्या अनुयायांनी नेमकी त्याउलट वाटचाल सुरू केली असून, त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या काळाराम मंदिर सत्याग्रहींना अभिवादन करण्यासाठी आयोजित केलेल्या सभेचे निमित्त शोधले आहे.
नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘शिका, संघटित व्हा व संघर्ष करा’ असा संदेश आपल्या अनुयायांना दिलेला असताना नाशकात मात्र त्यांच्या अनुयायांनी नेमकी त्याउलट वाटचाल सुरू केली असून, त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या काळाराम मंदिर सत्याग्रहींना अभिवादन करण्यासाठी आयोजित केलेल्या सभेचे निमित्त शोधले आहे. रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांनी सत्ताधारी पक्षाची साथ धरल्यामुळे त्यांना बाजूला सारून रिपाइंतील अन्य गट-तटांचे नेते एकत्र आले आहेत. विशेष म्हणजे शहरात दोन ठिकाणी होणाºया या अभिवादन सभेचे मुख्य आकर्षण असलेल्या आंबेडकरी ‘जलसा’साठी प्रसिद्ध गायक आनंद शिंदे व पुत्र आदर्श शिंदे हेदेखील रिपाइंच्या गटबाजीत आमने-सामनेच्या ‘जलसा’त उतरले आहेत. नाशिक येथील काळाराम मंदिरात दलित, मागासवर्गीयांना प्रवेश मिळावा यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २ मार्च १९३० रोजी सत्याग्रह केला होता. या घटनेचे स्मरण म्हणून दरवर्षी २ मार्च रोजी आंबेडकरी अनुयायांच्या वतीने नाशकात अभिवादन सभेचे आयोजन केले जाते. यंदाही या अभिवादन सभेची जोरदार तयारी करण्यात आली असून, या सभेच्या निमित्ताने आंबेडकरी शिकलेला समाज संघटित होऊन व्यवस्थेविरुद्ध संघर्ष करण्यासाठी प्रोत्साहित व्हावा, असा त्यामागचा हेतू आहे. परंतु प्रत्यक्षात या अभिवादन सभेच्या निमित्ताने आंबेडकरी अनुयायांमध्ये पारंपरिक असलेली गटबाजी उफाळून आली आहे. रिपब्लिकन पार्टीचे नेते व केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी सत्ताधारी भाजपाची साथ धरल्यामुळे एकप्रकारे त्यांनी द्रोह केल्याचे मानून राज्यातील रिपाइंचे सर्व गट-तट आठवलेंच्या विरोधात एकवटले आहेत. आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपाइंने काळाराम सत्याग्रहींना अभिवादन करण्यासाठी गोल्फ क्लब मैदानाची निवड करून थेट आठवले यांनाच त्यासाठी निमंत्रित केले आहे, तर प्रा. कवाडे यांची पिपल्स रिपब्लिकन, अण्णासाहेब कटारे यांची राष्टÑीय रिपब्लिकन, मनोज संसारे यांची स्वाभिमानी रिपाइं, इंदिसे यांची एकतावादी रिपाइं, भालेराव यांची राष्टÑीय दलित पॅँथर, अर्जुन डांगळे यांची जनशक्ती रिपाइं, विवेक चव्हाण यांची दलित कोब्रा व प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील भारिप बहुजन महासंघ असे डझनभर संघटनांनी एकत्र येऊन सत्याग्रहांचे ऐतिहासिक ठिकाण असलेल्या गंगाघाटावर अभिवादन सभेचे आयोजन केले आहे. आंबेडकरी गौरवगीतांसाठी सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जात असताना त्यात त्यांचा पुत्र आदर्श शिंदेदेखील सध्याच्या युवा वर्गात अधिक आकर्षण झाला आहे. त्यामुळे शुक्रवार, दि. २ मार्च रोजी शहरात दोन ठिकाणी होणाºया अभिवादन सभेचे मुख्य आकर्षण असलेले ‘जलसा’साठी दोन्ही गटांना शिंदे पिता-पुत्रांनाच आमंत्रित केले आहे. आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या जलसात आदर्श शिंदे, तर गंगा घाटावरील जलसात ज्येष्ठ गायक आनंद शिंदे व दत्ता शिंदे यांना पाचारण करण्यात आले आहे.
जलसा भरविण्याची परंपरा
दरवर्षी नाशकात आयोजित केल्या जाणाºया या अभिवादन सभेच्या निमित्ताने आंबेडकरी गौरवगीतांचा ‘जलसा’ भरविण्याचीही परंपरा सुरू झाली आहे. अभिवादन सभेत आजवर मान्यवरांनी मार्गदर्शन करून आंबेडकरी जनतेला एकजूट व एकसंघ राहून अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याचा संदेशच दिला आहे. त्यामुळे अभिवादन सभा म्हणजे एकप्रकारे आंबेडकरी अनुयायांसाठी स्फूर्तीच ठरत असताना त्यात आता ‘जलसा’ची भर पडल्याने दरवर्षाचे ते प्रमुख आकर्षण ठरले आहे. या जलसासाठी नाशिककर मोठ्या संख्येने गर्दी करीत असतात.