एकलहरे प्रकल्पाला मिळावी ऊर्जा

By sandeep.bhalerao | Published: November 25, 2018 11:34 PM2018-11-25T23:34:01+5:302018-11-26T00:31:01+5:30

एकलहरे येथील वीजनिर्मिती प्रकल्प बंद करून तो नागपूरला हलविण्यात येणार असल्याची चर्चा गेल्या तीन वर्षांपासून सुरू झाली आणि कामगारांसह स्थानिक नागरिकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाल्याने एकवटलेल्या ग्रामस्थांनी आता एकलहरे बचाव कृती समिती स्थापन करून लढा सुरू केला आहे.

 Single Power Project | एकलहरे प्रकल्पाला मिळावी ऊर्जा

एकलहरे प्रकल्पाला मिळावी ऊर्जा

Next

विचार विमर्श

एकलहरे येथील वीजनिर्मिती प्रकल्प बंद करून तो नागपूरला हलविण्यात येणार असल्याची चर्चा गेल्या तीन वर्षांपासून सुरू झाली आणि कामगारांसह स्थानिक नागरिकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाल्याने एकवटलेल्या ग्रामस्थांनी आता एकलहरे बचाव कृती समिती स्थापन करून लढा सुरू केला आहे. राज्य शासनाच्या मंत्र्यांकडून एकलहरे प्रकल्प बंद करण्यात येणार नसल्याचे एकीकडे सांगितले जात असताना दुसरीकडे राज्यातील जे प्रकल्प बंद करण्यात येणार आहेत त्यामध्ये एकलहरे प्रकल्पाचे नाव मात्र घेण्यात आले आहे. १ आगॅस्ट २०१८ च्या वीज नियामक आयोगाच्या अहवालात तर २०२१ पर्यंत टप्प्याटप्प्याने एकलहरे प्रकल्प बंद करण्याचे नमूद करण्यात आल्याने राज्य शासनाची संदिग्ध भूमिका कायम आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्यामुळे तर या लढ्याला अद्याप राजकीय पाठबळ मिळाले नसल्याने ग्रामस्थ एकाकी लढत आहेत. एकलहरे प्रकल्प बंद करण्याचे कोणतेही सबळ कारण शासनाकडे नाही, एकलहरेपेक्षा दूरवरील प्रकल्पांना कोळशाची वाहतूक परवडते फक्त नाशिकला कार परवडत नाही, असा सवाल करीत कृती समितीच्या सदस्यांनी आपली प्रखर भावना ‘लोकमत’च्या व्यासपीठावर मांडली.
राजकीय इच्छाशक्तीचा अभाव
एकलहरे येथे नवीन प्रकल्प व्हावा यासाठी आमदार, खासदार, ऊर्जामंत्री यांच्यासह शरद पवार, धनंजय मुंढे, छगन भुजबळ या सर्वांना निवेदने दिली. एकलहरे परिसरातील सामनगाव, कोटमगाव, हिंगणवेढा, एकलहरेगाव, ओढा या गावांच्या ग्रामपंचायतींच्या ठरावांसह निवेदने देऊनही शासन येथील प्रकल्पासाठी प्रयत्नशील नाही असे दिसते. नाशिकला ऊर्जामंत्री महोदयांचा जनता दरबार झाला तेव्हा त्यांनी आश्वासन दिले होते की नवीन प्रकल्प हा एकलहरेत प्रथम प्राधान्याने देऊ. मात्र त्यांनी तसे न करता भुसावळला प्राधान्य देऊन तेथे ६६०चा प्रकल्प नेला. आमच्या पंचक्र ोशीतल्या गावांची ६५० हेक्टर जमीन आम्ही औष्णिक वीज प्रकल्पासाठी अत्यंत कमी भावात दिली. त्या जमिनीचा वापर औष्णिक प्रकल्पासाठीच झाला पाहिजे. १४० चे जुने संच बंद करताना ६६० चे आश्वासन दिले. सिव्हिल विभागाने मोजनीही केली. मग कुठे माशी शिंकली की अजूनही समजत नाही. त्याऐवजी सोलरच्या हालचाली सुरू आहेत, पण सोलर हा पर्याय होऊ शकत नाही. केवळ राजकीय इच्छाशक्ती नसल्याने एकलहरे प्रकल्प शेवटच्या घटका मोजत आहे.  - राजाराम धनवटे, माजी सरपंच, एकलहरे
प्रकल्प वाचविण्यासाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार
येथील प्रकल्पाबाबत बरीच चर्चा सध्या सुरू आहे. प्रत्येकजण या ना त्या मार्गाने येथे नवीन प्रकल्प व्हावा यासाठी प्रयत्नशील आहे. प्रकल्प बचाव संघर्ष समितीने मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न फोल ठरला. राज्य शासन व महानिर्मिती कंपनी या प्रकल्पाकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत असेल तर आता आम्ही केंद्राकडे पाठपुरावा करायचा का? येथील हायस्कूलच्या ७५० विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोस्ट कार्ड पाठवून येथील प्रकल्प वाचविण्याची विनंती केली. येथील प्रकल्प वाचला तरच शाळा वाचेल व शिक्षण पूर्ण करता येईल. अन्यथा बाहेरच्या महागड्या शाळेत जावे लागेल. येथील सिद्धार्थनगर परिसरातील गोरगरीब, कष्टकरी यांची मुले या शाळेत शिकतात. त्यांना बाहेर जाऊन शिक्षण घेणे परवडणार नाही. यासाठी वैयक्तिक स्वत: केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन येथील बिकट परिस्थितीची कल्पना देणार आहे. काहीही झाले तरी एकलहरेचा प्रकल्प येथेच झाला पाहिजे  - अतुल धनवटे, व्यावसायिक, एकलहरे
तीनही संच बंद करण्याचा घाट
वीज नियामक आयोगाने दिलेल्या आदेश क्र मांक १५४/२०१८ दिनांक १ आॅगस्ट २०१८ मध्ये महानिर्मितीने आपले येणारे आगामी नवीन प्रकल्प व त्याबदल्यात बंद करण्यात येणारे निर्मिती संच अशी माहिती प्रसिद्ध केली आहे. त्यावरून असे दिसते की नाशिकचे संच ३-४-५ हे जानेवारी २०२१ पर्यंत टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येतील. त्यामुळे नाशिकची वीजनिर्मिती ठप्प होईल. कुठल्याही कामगार-कर्मचारी संघटनांशी चर्चा न करता हे नियोजन करण्यात आले आहे. महानिर्मितीच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या बैठकीत मुंबईलगतच्या भागात २०२१ नंतर विजेची मागणी वाढेल त्यासाठी नाशिकचा प्रकल्प योग्य पर्याय असेल. त्यानुसार वीज नियामक आयोगाच्या आदेश क्रमांक ४२/२०१७ मार्च २०१८ मध्ये नमूद करण्यात आले होते. मात्र सद्यस्थितीत नवीन प्रकल्पाबाबत चर्चा नाही. २१० मेगावॉटचे तीनही संच बंद करण्याचे नियोजन झाले आहे.  - सुयोग झुटे, जनरल सेक्रेटरी,  ग्रॅज्युएट इंजिनिअर्स असोसिएशन
महानिर्मितीची शंकास्पद भूमिका
टप्पा क्र मांक एकचे १४० मेगावॉटचे दोन संच बंद केले तेव्हाच सर्वांनी विरोध करायला हवा होता. मात्र त्यावेळी कर्मचारी संघटनांची दिशाभूल करून खोटी आश्वासने देऊन ते संच बंद केले. त्यावेळी नवीन ६६० मेगावॉटचा प्रकल्प होईल अशा भूलथापा मारण्यात आल्या. नंतर पॉवर हाउस व कॉलनी परिसरात मोजमाप करण्याचे नाटकही करण्यात आले. अर्धी कॉलनी तुटेल, शाळा तुटेल, मार्केट तुटेल, कामगारांना राहण्यासाठी बहुमजली इमारती उभ्या राहतील अशी अनेक स्वप्ने दाखवण्यात आली. आता काय कोळसा वाहतूक लांब पडते म्हणून उत्पादन खर्च वाढतो असे न पटणारे कारण सांगून येथील ६६०चा प्रकल्प अन्यत्र हलविण्याच्या हालचाली सुरू आहेत. चंद्रपूर, खापरखेडा, परळी येथे पाण्याची टंचाई आहे तेथे नवीन प्रकल्प देता. मात्र नाशिकला सर्वसोयींनीयुक्त वातावरण आहे. येथे मात्र नवीन प्रकल्प देता येत नाही हे शंकास्पद आहे. हा नाशिककरांवर अन्याय आहे. येथील ८०० च्या जवळपास टेक्निकल स्टाफ व सुमारे २५०० रोजंदारी कामगारांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.  - अरविंद वाकेकर, अध्यक्ष, महाराष्ट राज्य मागासवर्गीय वीज कामगार संघटना
सुपर क्रिटिकल प्रकल्प व्हावा
आमची १२५ हेक्टर जमीन एकलहरे प्रकल्पाच्या राख साठवणूक बंधाºयासाठी संपादित केली आहे. या प्रकल्पामुळे अनेक कुटुंबांना रोजगार मिळाला. आता हा प्रकल्प बंद होणार या भीतीमुळे परिसरात चलबिचल सुरु झाली आहे. येथील कामगार व मजुरांचा रोजगार वाचवण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या तीनही संचांचे नूतनीकरण केले व दर दोन वर्षांनी ओव्हर आॅलिंग केले तर त्यानचे आयुर्मान १० ते १५ वर्षांनी वाढेल. प्रस्तावित ६६०चा प्रकल्पही मंजूर आहे मात्र शासनाच्या निष्काळजीपणामुळे काम सुरु होत नाही. या केंद्राचा वीजनिर्मितीसाठी देशात २७वा नंबर आहे. वीज केंद्राच्या राखेमुळे व केमिकलयुक्त पाण्यामुळे कोटमगाव परिसरातील जमीन नापिक झाली असली तरी आमच्या गावातील बहुतांश तरुणांना प्रकल्पग्रस्त म्हणून रोजगार मिळाला आहे. तो रोजगार टिकून रहावा म्हणून येथे सुपर क्रिटिकल नवीन टेक्नॉलॉजीचा पॉवर प्रकल्प होणे गरजेचे आहे. त्यासाठी कोळसाही कमी लागेल व रोजगारही वाचेल.
- बाळासाहेब म्हस्के,  सरपंच, कोटमगाव

Web Title:  Single Power Project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.